15 महिलांना 'मोक्ष' दिल्याचा खळबळजनक दावा
पोलिस चौकशी दरम्यान आलेक्सेईने केवळ या दोनच नाही, तर तब्बल 15 महिलांना 'मोक्ष' दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्याने गोवा आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये मिळून हे खून केल्याचे सांगितले असून यामुळे तपासाची व्याप्ती वाढली आहे. मात्र, कोठडीत तो वारंवार आपली विधाने बदलत असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले असून प्रकरणाची गुंतागुंत वाढत चालली आहे.
advertisement
रागाच्या भरात खून
आलेक्सेई हा प्रामुख्याने रशियन महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळायचा, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जेव्हा या महिला इतर कोणाशी बोलत आहेत किंवा संपर्कात आहेत असे त्याला वाटायचे, तेव्हा तो रागाच्या भरात त्यांचा खून करत असे. पैशांच्या हव्यासापोटी त्याने अनेक महिलांशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्यांचे आयुष्य संपवलं.
दोन्ही हत्यांची कबुली दिली
पेडणे तालुक्यातील बामनभाटी-हरमल येथे 35 वर्षीय एलिनाचा गळा चिरून खून करण्यात आला, तर मोरजीमध्ये 37 वर्षीय एलिना वानिवा या रशियन महिलेचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. मांद्रे पोलिसांनी शिताफीने या संशयिताला पकडल्यानंतर त्याने या दोन्ही हत्यांची कबुली दिली आहे. सध्या पोलिस तो नेमका कुठे राहायचा आणि त्याने इतर कुठं गुन्हे केले आहेत, याचा शोध घेण्यासाठी किनारपट्टी भागात मोठी झाडाझडती मोहीम राबवत आहेत.
संशयिताचा 15 खुनांचा दावा
दरम्यान, मांद्रेचे पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केवळ दोन महिलांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. संशयिताने 15 खुनांचा दावा केला असला तरी त्याची पूर्ण कबुली अद्याप स्पष्ट झालेली नाही, त्यामुळे हिमाचल प्रदेश पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला आहे. गोव्यातील किनारी भागात विदेशी नागरिक राहत असलेल्या खोल्यांची कसून तपासणी केली जात असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
