सोसायटीत घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील माणेरे गावात सोसायटीच्या थकीत मेंटेनन्सवरून सोसायटीच्या चेअरमनला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
जिथे माणेरे गावातील एका सोसायटीत दत्तात्रय निकम हे चेअरमन म्हणून काम पाहतात. त्याच सोसायटीत राहणारे साईनाथ राठोड यांच्याकडे 2025 वर्षाचा सोसायटी मेंटेनन्स अनेक दिवसांपासून देयचा बाकी होता. याबाबत दत्तात्रय निकम यांनी सोसायटीचे सदस्य तुषार वांद्रे यांना माहिती दिली होती.
advertisement
काही दिवस उलटून गेल्यानंतर 7 मार्च रोजी दत्तात्रय निकम यांनी साईनाथ राठोड यांच्याकडे थकीत मेंटेनन्स भरण्याबाबत विचारणा केली. यामुळे साईनाथ राठोड संतापले. त्यांनी दत्तात्रय निकम यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान हा वाद सुरू असतानाच साईनाथ राठोड यांचा मुलगा घटनास्थळी आला. ''माझ्या वडिलांशी वाद का घालत आहात?'' असे म्हणत दोघांनी मिळून दत्तात्रय निकम यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात दत्तात्रय निकम गंभीर जखमी झाले. ही घटना इतरांना समजताच तत्काळ निकम यांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विठ्ठलवाडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
