हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार!
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये या घरांच्या लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर एप्रिल किंवा मे 2026 मध्ये प्रत्यक्ष सोडत प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे.
कुठे आहे प्राईम लोकेशन्स?
सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये घरांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी स्वतःचे घर घेणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीसारख्या परिसरांमध्ये परवडणाऱ्या दरात मिळणारी म्हाडाची घरे अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहेत.
advertisement
कोकण मंडळाच्या घरांना नेहमीच मोठी मागणी असते. 2025 मध्ये केवळ 5 हजार घरांसाठी दीड लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते. त्यामुळे यंदाही या लॉटरीला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी पुरेशी घरे उपलब्ध नसल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे अनेक इच्छुक नागरिक नाराज झाले होते. अशा पार्श्वभूमीवर कोकण मंडळाची ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या लॉटरीमध्ये खासगी विकासकांकडून मिळणाऱ्या 15 आणि 20 टक्के आरक्षित घरांचा तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत उपलब्ध घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना घर मिळण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
