चल तुला घरी सोडतो...
आगरवायंगणी बौध्दवाडी, ता. दापोली येथील रहिवासी असलेला 46 वर्षीय किशोर येलवे हा दाभोळमधील जिल्हा परिषद शाळेत शिकवतो. दाभोळमधील भंडारवाडा येथे दुपारी साधारण 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास ही घृणास्पद घटना घडली. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर अल्पवयीन मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असताना, येलवेने तिला घरी सोडण्याची बतावणी केली. मुलीला न्यायला कोणी आले नसल्याचे पाहून, त्याने आपल्या बाईकने 10 वर्षीय मुलीला घरी सोडण्यास नेलं.
advertisement
शरीरावर हात फिरवून घृणास्पद कृत्य
मुलीच्या घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत, या नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या समान असलेल्या अल्पवयीन मुलीच्या शरीरावर हात फिरवून त्याने घृणास्पद कृत्य केले. झालेल्या प्रकाराबद्दल कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही या शिक्षकाने मुलीला दिली. या प्रकारामुळे घाबरलेली मुलगी तेथून निघून गेली, तर येलवेनेही घटनास्थळावरून पळ काढला.
शिक्षकाविरोधात तक्रार दाखल
मात्र, झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सर्व प्रकार शेजारच्या कुटुंबाला सांगितला. त्यानंतर ही संपूर्ण माहिती तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वीही याच शिक्षकाने या मुलीला घरी सोडले होते, अशी माहिती पुढे आली आहे. पीडितेच्या पालकांनी जराही वेळ न घालवता दाभोळ पोलीस स्थानक गाठले आणि शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.
बालसुरक्षेचा प्रश्नावर ऐरणीवर
दाभोळ पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत शिक्षक किशोर येलवेला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पॉस्को (POCSO) कायद्याचे कलम 8 आणि 10, तसेच बीएनएस (BNS) 74 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल गोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीला दापोलीत नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने समाजात बालसुरक्षेच्या गंभीर प्रश्नावर पुन्हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, तर मुलीच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या धाडसामुळे अशा विकृत प्रवृत्तींना आळा घालण्यास मदत होते, हे देखील अधोरेखित झाले आहे.
