रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तेथून निवडणूक लढवायची होती, असा शिवसेनेचा दावा मागे घेण्यात आला. आता त्यांनी नाव मागे घेतले असून भाजपचे उमेदवार नारायण राणे असणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील.
advertisement
उदय सामंत यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. उदय सामंत यांची पत्रकार परीषद संपताच भाजप आमदार नितेश राणे यांचा उदय सामंत आणि किरण सामंत यांना फोन केला. फोनवरून नितेश राणे यांनी आभार व्यक्त केले. उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून देखील रस्सी खेच सुरू होती. उमेदवारीसंदर्भात काल संध्याकाळपर्यंत चर्चा झाली. यासाठी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. तेव्हा किरण सामंत यांच्या उमेदवारीसंदर्भात आम्ही चर्चा केली असंही उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केल्यास आमचा त्यांना पाठिंबा असेल. आम्ही यासाठी मानसिक तयारी केली असल्याचं उदय सामंत म्हणाले.
नारायण राणे यांचा अर्ज भरताना आम्ही त्यांच्यासोबत राहू. सध्या आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही उदय सामंत यांनी सांगितलं.
