प्रभू रामाचं मंदिर बनावं, 370 कलम हटावं हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. आपल्या वडिलांचं स्वप्न ज्यांनी साकार केलं, त्यांच्याबद्दल उद्धवजींना आदर हवा होता, त्यांचे आभार उद्धवजींनी मानायला हवे होते. पण उद्धव ठाकरे आज काँग्रेसचे पाय चाटत आहेत. मोदींजींबद्दल आदर सोडा नेहमी टीकाच करतात. शिवसेनाप्रमुखांच्या पोटी असा नालायक मुलगा जन्माला आला याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला वाटते. आज उद्धवजी घराबाहेर पडले आहेत ते फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच अशा शब्दा रामदास कदम यांनी ठाकरेंवर टीकास्र सोडले.
advertisement
मोठ्या फरकाने आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असुदे, राष्ट्रवादी असुदे आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा यांच्या कामावर आम्ही विश्वास ठेवून आलोय.आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. ज्या सिटिंग जागा आहेत तिथे भाजपची काही मंडळी प्रयत्न करत असल्याचं रामदास कदम म्हणाले.
केसाने गळा कापू नका
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, संभाजीनगर इथे महाराष्ट्रातल्या भाजपकडून जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद आहे. मोदीजी आणि शहा साहेबानी महाराष्ट्रातील काही भाजपा नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, पकडले पाहिजेत. तुमच्यावर विश्वास ठेवून जी लोकं आली आहेत, त्यांचा केसाने गळा कापू नका असंही रामदास कदम यांनी म्हटलं.
भाजपने माझ्या मुलाविरोधात काम केलं
खेड दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपने युती असतानाही 2019 मध्ये उघडपणे माझ्या मुलाच्या विरोधात काम केलं. 2009 मध्ये युती असतानाही मला गुहागरमध्ये भाजपनेच पाडलं, हे वास्तव आहे. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात पुन्हा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते उद्घाटने, भूमिपूजने स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करताहेत. हे असं असेल तर भविष्यात भाजपवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवर भाजपच्या मंडळीनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा रामदास कदम यांनी व्यक्त केली.
विश्वासघात झाला तर...
आम्ही मोदीजींकडे, अमितजी शहा यांच्याकडे बघून आलोय. मागच्या निवडणुकीत काय झालं मला माहित नाही, पण पुन्हा पुन्हा आमचा विश्वासघात झाला, तर माझंही नाव रामदास कदम आहे हे मी आज सांगतोय असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, ज्यावेळी लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील त्यावेळी मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा मांडेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करताहेत. जागेची मागणी कोणीही करू शकतो, पण मतदारसंघात कोणाचं वर्चस्व आहे ते पाहिले पाहिजे.
भाजपला इतरांना नेस्तनाबूत करायचंय का?
आमचे 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदार इकडे आले. राष्ट्रवादीचे किती आले हे भुजबळांनी सांगावं? 22 जागा आम्ही लढल्या होत्या ज्या जागा आम्ही लढलोय त्यावर आमचा अधिकार निश्चितच आहे. भाजपच्या सर्व्हे बद्दल मला कल्पना नाही पण ते 36 नाही 48 पण जागा मागू शकतात. सगळ्या ठिकाणी कमळच न्यायचं आणि इतर सगळ्यांना नेस्तनाबूत करायचं असं चाललं आहे की काय अशी मला शंका येतेय असंही रामदास कदम यांनी म्हटलं.
