ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 450 वर्षांपासून गावात ही प्रथा पाळली जाते. या गावपळणीला शुक्रवारपासून सरुवात झाली आहे. गावपळणी दरम्यान गावातील सर्व ग्रामस्थ आपला संसार घेऊन नजीकच्या सडूरे गावाच्या हद्दीत असलेल्या दडोबा डोंगराच्या पायथ्याला वास्तव्याला जातात. तिथेच तंबू ठोकून पाच दिवस राहातात. या काळात हे ग्रामस्थ आपले पाळीव प्राणी देखील गावात ठेवत नाहीत. पाच दिवस संपूर्ण गाव वस पडतं.
advertisement
त्यानंतर गावभरणीच्या वेळी देवाला कौल लावला जातो. जोपर्यंत देव गांगोचा हुकूम मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेरच राहतात. त्यामुळे तीन, पाच किंवा सात दिवसांची ही गावपळण असते. तळकोकणातील तीन गावात ही प्रथा पाळली जाते. शिराळे, आचरा, चिंदर या गावात ही प्रथा पाळली जाते. मात्र शिराळे हे असं एकमेव गाव आहे, की या गावात दरवर्षी ही प्रथा पाळली जाते.
प्रथेनुसार वर्षातून एकदा इथे गाव सोडावा लागतो आणि गावात 5 दिवस कोणी माणूस थांबत नाही असं इथले स्थानिक ग्रामस्थ सांगतात. तसेच जनावरे पाळीव प्राणी, कोंबड्या, गुरे ढोरे ,सर्व वेशी बाहेर घेऊन जावे लागतात. शाळा सुद्धा गावात 5 दिवस भरत नाही. ती सुद्धा गावाबाहेर भरवली जाते. त्यामुळे या गावात फक्त स्मशान शांतता असते.
या गावपळणीसाठी चाकरमानी, लेकीबाळीही आवर्जून हजेरी लावतात. तीन दिवसानंतर गावाच्या देवाला कौल लावून पुन्हा हे ग्रामस्थ माघारी गावात येतात. रात्रीच्या वेळी मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांच आयोजन केलं जातं असं येथील ग्रामस्थ सांगतात.
