केरळमधील अवघ्या 10 महिन्यांची आलिन शेरिन अब्राहम. या चिमुकलीने या जगाचा निरोप घेतला, पण जाताना ती चार जणांना नवजीवन देऊन गेली. आलिन ही केरळमधील सर्वात कमी वयाची 'ऑर्गन डोनर' (अंगदाता) ठरली आहे. तिच्या या महान कार्याला सलाम करण्यासाठी राज्य सरकारने तिचा अंत्यविधी पूर्ण शासकीय इतमामात केला. आलिनच्या या बलिदानानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे 'अंगदान' या श्रेष्ठ दानाची.
advertisement
अंगदान नक्की काय असतं? ते कसं काम करतं? आणि एक निर्णय किती जीव वाचवू शकतो? जाणून घेऊया.
1. अंगदान म्हणजे नक्की काय? (What is Organ Donation?)
सोप्या भाषेत सांगायचं तर, अंगदान ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एका व्यक्तीचे निरोगी अवयव काढून ते अशा रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित (Transplant) केले जातात, ज्याचे अवयव निकामी झाले आहेत. ही एक अतिशय गुंतागुंतीची आणि वेळेचं महत्त्व असलेली वैद्यकीय प्रक्रिया आहे. यामध्ये डोनरच्या शरीरातून अवयव काढणे आणि गरजू रुग्णाच्या शरीरात ते बसवणे, या दोन्ही शस्त्रक्रिया जवळपास एकाच वेळी पार पाडल्या जातात.
2. अंगदानाचे प्रकार
अंगदान प्रामुख्याने दोन प्रकारे केले जाते मृत्यूनंतरचे दान (Deceased Donation): यामध्ये प्रामुख्याने 'ब्रेन डेथ' (मेंदू मृत) घोषित झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या संमतीने अवयव दान केले जातात. मृत्यूनंतर हृदय, यकृत (Liver), किडनी, फुफ्फुस, स्वादुपिंड आणि आतडे यांसारखे अवयव दान करता येतात. तसेच डोळे, त्वचा आणि हाडे यांचेही दान होऊ शकते.
जिवंतपणी केलेले दान (Living Donation): एखादी निरोगी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने किडनी किंवा यकृताचा काही भाग दान करू शकते. अर्थात, यासाठी डोनरची प्रकृती उत्तम असणे आणि त्याचे अवयव रुग्णाच्या शरीराशी सुसंगत असणे अनिवार्य असते.
3. कोण होऊ शकतं डोनर?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जवळजवळ प्रत्येक व्यक्ती अंगदाता होऊ शकते. अंगदानासाठी तुमचं वय किती आहे यापेक्षा तुमचे अवयव किती निरोगी आहेत आणि तुमची वैद्यकीय चाचणी काय सांगते, हे जास्त महत्त्वाचं असतं. 10 महिन्यांच्या आलिनने हेच सिद्ध करून दाखवलं की, वयाचा आकडा दातृत्वाच्या आड येत नाही.
4. वेळेचे महत्त्व आणि प्रक्रिया:
मृत्यूनंतर होणाऱ्या अंगदानात 'वेळ' हा सर्वात मोठा घटक असतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही तासांच्या आतच अवयव काढून ते सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. जर उशीर झाला, तर त्या अवयवांची उपयुक्तता संपू शकते. म्हणूनच अशा वेळी ग्रीन कॉरिडॉर किंवा विशेष विमानांची मदत घेतली जाते.
आलिन आज आपल्यात नाही, पण कोणाचे तरी डोळे तिच्यामुळे हे जग पाहत असतील, कोणाचं तरी हृदय तिच्यामुळे धडधडत असेल. अंगदान हा केवळ वैद्यकीय निर्णय नसून तो माणुसकीचा सर्वोच्च अविष्कार आहे. आपला एक निर्णय कोणाचं तरी पूर्ण आयुष्य बदलू शकतो.
