फराळ खाऊन वाढल्या दातांच्या समस्या
दिवाळीत लाडू, चिवडा, करंजी, चकली अशा गोड तिखट फराळाचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर आता दातदुखी, दातात अडकलेले अन्नकण काढून दात साफ करणे, याचा नागरिकांना त्रास होऊ लागला. लहान मुलांमध्ये दातात अडकलेल्या पदार्थांमुळे होणाऱ्या कॅव्हिटी, सूज आणि वेदना वाढल्याचे दंतचिकित्सक सांगतात. लाडू, बर्फी, अनारसा, करंजीतील साखर आणि तुपामुळे दातांवर चिकट थर बसतो. काही दिवस नियमित दात न घासल्यास किंवा खाल्ल्यावर लागलीच दात न घासल्यास कीड लागण्याची शक्यता वाढते.
advertisement
दातदुखी वाढण्याची कारणे
साखर आणि चिकट पदार्थ: फराळातले लाडू, मिठाई आणि शंकरपाळी यांसारखे पदार्थ दातांना चिकटून बसतात, ज्यामुळे दातांच्या फटीत किटाणू वाढून 'ऍसिड' तयार होते आणि किड लवकर वाढते.
दातांची संवेदनशीलता: थंड पेये किंवा गरम चहा/कॉफीचे अतिसेवन आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांमध्ये असलेल्या जुन्या किडीची किंवा उघड्या पडलेल्या दातांच्या मुळांची संवेदनशीलता वाढते.
कडक पदार्थांमुळे आघात: कडक चिवडा, शेव किंवा चिक्की यांसारखे पदार्थ खाल्ल्याने दातांच्या पातळ झालेल्या थरावर किंवा जुन्या भरलेल्या जागेवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे वेदना वाढतात.
तात्काळ उपाय
कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या: दातदुखी किंवा सूज असल्यास, कोमट पाण्यात मीठ टाकून दिवसातून ३-४ वेळा गुळण्या करा. मीठ नैसर्गिक जंतुनाशक म्हणून काम करते आणि सूज कमी करण्यास मदत करते.
लवंग किंवा लवंग तेल: लवंग मध्ये नैसर्गिकरित्या वेदनाशामक गुणधर्म असतात. एक लवंग दुखणाऱ्या दाताखाली ठेवा किंवा लवंगाचे तेल कापसावर घेऊन दुखणाऱ्या जागेवर लावा.
दोनदा ब्रश करणे आवश्यक: दातांच्या फटीमध्ये फराळातील चकली, शंकरपाळे किंवा बारीक पदार्थ अडकतात. हे पदार्थ दातात जास्त वेळ राहिल्यास बॅक्टेरिया वाढतात आणि त्यातून कॅव्हिटी निर्माण होते, असे ठाण्यातील दंतचिकित्सकांनी सांगितले. त्यामुळे फराळाचा आनंद घेतानाच दातांमध्ये अडकलेले पदार्थ काढणे, फ्लॉसचा वापर करणे आणि दिवसातून दोनदा ब्रश करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दंतवैद्याचा सल्ला: घरगुती उपायांनी आराम न मिळाल्यास किंवा सूज, ताप किंवा तीव्र वेदना जाणवल्यास त्वरित दंतवैद्याचा सल्ला घ्या. उपचारास विलंब केल्यास संसर्ग वाढू शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
