मात्र अंडी जितकी पौष्टिक आहेत, तितकीच ती योग्य पदार्थांसोबत खाणंही महत्त्वाचं आहे. चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे अंड्यांचे फायदे कमी होऊ शकतात आणि पचनाशी संबंधित त्रासही उद्भवू शकतो. त्यामुळे अंडी खाताना कोणते पदार्थ टाळावेत, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
अंड्यानंतर हे पदार्थ खाणं टाळा..
सोया मिल्क
सोया मिल्क आरोग्यासाठी चांगलं असलं, तरी ते अंड्यांसोबत घेणं टाळावं. अंड्यांमध्ये आधीच उच्च दर्जाचं प्रोटीन असतं आणि सोया मिल्कमध्येही प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. दोन्ही एकत्र घेतल्यास पचनसंस्थेवर जास्त ताण येतो आणि प्रोटीन योग्य प्रकारे शरीरात शोषलं जात नाही. त्यामुळे शरीराला अपेक्षित पोषण मिळत नाही. प्रोटीनचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर अंडी आणि सोया मिल्क वेगवेगळ्या वेळेला घेणं उत्तम ठरतं.
advertisement
साखर आणि गोड पदार्थ
अंड्यांसोबत साखर किंवा गोड पदार्थ खाणंही नुकसानकारक ठरू शकतं. अंडी प्रोटीन आणि अमिनो अॅसिड्सने समृद्ध असतात, तर साखर लवकर पचते. या संयोजनामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते आणि पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी अंडी खाल्ल्यानंतर गोड पदार्थ, मिठाई किंवा साखरयुक्त पेयांसोबत घेणं टाळावं.
केळी
अंडी आणि केळी दोन्हीही पौष्टिक असले तरी ती एकत्र खाणं योग्य नाही. हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास पचनास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अंडी आणि केळी वेगवेगळ्या वेळेला खाणं अधिक फायदेशीर ठरतं. उदाहरणार्थ, सकाळच्या नाश्त्यात अंडी घ्या आणि काही वेळाने किंवा जेवणानंतर केळी खा. यामुळे दोन्ही पदार्थ सहज पचतात आणि शरीराला संपूर्ण पोषण मिळतं.
चहा
अनेक लोकांना अंड्यांसोबत चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी योग्य नाही. चहामधील काही घटक प्रोटीनचे शोषण कमी करतात. यामुळे गॅस, पोट फुगणं आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर अंडी आणि चहा दोन्ही घ्यायचे असतील तर त्यामध्ये किमान 30 ते 60 मिनिटांचं अंतर ठेवणं आवश्यक आहे.
एकंदरीत अंडी ही अत्यंत पौष्टिक असली तरी ती कोणत्या पदार्थांसोबत घेतली जातात, याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य फूड कॉम्बिनेशन ठेवल्यास अंड्यांचे फायदे अधिक मिळतात आणि पचनाशी संबंधित त्रासही टाळता येतो. त्यामुळे अंडी खाताना हे पदार्थ टाळून, संतुलित आणि योग्य आहार निवडा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
