BMC Election: कुठे नोटा, कुठे बॅगा, तर कुठे वॉशिंग मशीन! २९ महापालिकांच्या निवडणुकीत 'असं' चाललंय लक्ष्मी दर्शन
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mahanagar Palika Election: काही ठिकाणी नोटांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला. तर, काही ठिकाणी चक्क वॉशिंग मशीनचं वाटप करण्याचा प्रयत्न घडला.
मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा प्रचार थंडावला असला तरी छुपा प्रचार आणि मतदारांना लक्ष्मी दर्शन देण्याचे प्रकार घडू समोर आले आहेत. काही ठिकाणी नोटांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला. तर, काही ठिकाणी चक्क वॉशिंग मशीनचं वाटप करण्याचा प्रयत्न घडला. मुंबई, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड ते जळगाव अशा विविध ठिकाणी मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार समोर आले आहेत.
advertisement
जळगावात पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !
जळगाव शहरात मतदानासाठी पैसे वाटप करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणी अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना मतदानासाठी पैसे दिले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
advertisement
व्हिडिओमध्ये मतदारांना पैसे देतानाच मतदान कसे आणि कुणाला करावे याबाबत डेमो दिला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना सोशल मीडियावर टॅग करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. रात्री व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची सत्यता तपासण्यात आली आहे का, तसेच तक्रारीची दखल घेण्यात आली आहे का?, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
advertisement
मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप...
वॉर्ड क्र. १९३ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी पैसे वाटल्याचा आरोप ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांनी केला. १९३ क्रमांकाच्या प्रभागात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर उभ्या आहेत. तर सूर्यकांत कोळी यांनी तिकीट न मिळाल्यानं ठाकरेंची साथ सोडत अपक्ष फॉर्म भरलाय. सोमवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर आणि महिला संघटक संस्कृती सावंत हे शिंदेच्या नेत्याच्या घरून पैसे वाटत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कोळींच्या मुलीनं तीथं जाऊन जाब विचारला. मात्र पैसे टॉयलेटमधून फ्लश केल्यानं पुरावा सापडला नाही असा दावा सूर्यकांत कोळी यांच्या कन्येनं केलाय. तर दरम्यान हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत.
advertisement
उल्हासनगरमध्ये रिक्षातून पैशांचं वाटप...
उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात एका रिक्षातून बॅग भरून पैसे घेऊन चालले होते. त्यावेळेस अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी या रिक्षाचा पाठलाग करून ही रिक्षा सुभाष टेकडी परिसरात आल्यानंतर तिला थांबवलं आणि त्यात पैशाने भरलेली बॅग आढळून आली .यानंतर या रिक्षातील तरुणांना पकडून पोलीस चौकीत नेण्यात आलं. भाजपानं हे उमेदवारांसाठी पैसे पाठवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार गायकवाड यांनी केलाय. तर भाजपने मात्र हे आरोप फेटाळलेत...
advertisement
पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क वॉशिंग मशीन...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
advertisement
महिला मतदारांना कोंडून ठेवलं...
जळगावात प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून पैसे वाटपाबरोबरच मतदार महिलाना कोंडून ठेवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार कैलास हटकर यांनी केला. महापालिकेचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी आले, मात्र कुठलीही कारवाई न करता त्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. पैसे वाटपाचा प्रश्नच नाही, महिलाना कोंडले नसून चुकीचे आरोप असल्याचे शिवसेनेचे उमेदवार माजी महापौर ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता माळी- कोल्हे यांनी म्हटले.
महिलेकडून उमेदवाराच्या नावाने पैसे वाटप...
मीरा-भाईंदरमधील पंकरपाडा परिसरात शिवसेनेच्या उमेदवार रिया महात्रे यांच्याशी संबंधित प्रकरणात पैसे वाटप केल्याचा आरोप समोर आला आहे. रिया महात्रे यांच्या नावाने एका महिलेकडून लिफाफ्यांद्वारे पैसे दिले जात असल्याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली. घटनास्थळी पोलिस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी दाखल झाले असून संबंधित महिला व रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 9:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: कुठे नोटा, कुठे बॅगा, तर कुठे वॉशिंग मशीन! २९ महापालिकांच्या निवडणुकीत 'असं' चाललंय लक्ष्मी दर्शन





