आधी शरीरसंबंध ठेवले मग प्रेयसीची केली हत्या, नागपुरात तरुणाचं भयंकर कृत्य, 48 तासात अटक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नागपूरच्या नारा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे.
नागपूरच्या नारा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या ४८ तासात या घटनेचा उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयत महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे. त्यानेच होळीच्या दिवशी प्रेयसीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांकडे कसलाही पुरावा नसताना अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याची उकल केल्याने पोलिसांचं कौतुक होत आहे. या घटनेचा अधिक तपास जरीपटका पोलीस करत आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीच्या तिसऱ्या दिवशी नारा परिसरातील साई ले-आऊटजवळ असलेल्या एका शेतात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने पोलिसांसमोर मृताची ओळख पटवणं आणि खुनाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र, पोलिसांनी तपासचक्र वेगानं फिरवून या प्रकरणाचा छडा लावला.
४८ तासात खुनाचा उलगडा
advertisement
राजेंद्र ऊर्फ रज्जू यादव (वय ४५), रा. छपारा, मध्य प्रदेश असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो व्यवसायानं मजूर आहे. त्याचे दासिया उईके (वय ३५) नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रज्जूला तिच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून होळीच्या रात्री दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात रज्जूने दासियाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती की, दासियाच्या पोटावर गंभीर मार लागल्याने तिच्या गर्भाची पिशवी फुटली आणि अंतर्गत रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
शेतकऱ्याला दिसला कुजलेला मृतदेह
दासियाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच रज्जू घाबरला. त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेतात नेऊन टाकला आणि तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तिथून फरार झाला. काही दिवसांनी शेतमालक तळेकर हे तुरीचे खळे करण्यासाठी शेतात गेले असता, त्यांना उग्र दर्प आला. त्यांनी आसपास शोध घेतला असता त्यांना कुजलेला मृतदेह दिसला आणि त्यांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली.
advertisement
आधी शरीरसंबंध मग हत्या
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाबी समोर आल्या. महिलेचा मृत्यू मारहाणीमुळे झाला असून तिच्या ओटी पोटात गंभीर दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. तसेच घटनेपूर्वी शारीरिक संबंध ठेवल्याचेही समोर आलं. या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी रज्जूला शोधून काढले. जरीपटका पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत या गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 9:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी शरीरसंबंध ठेवले मग प्रेयसीची केली हत्या, नागपुरात तरुणाचं भयंकर कृत्य, 48 तासात अटक










