पुणेकरांच्या जीवाशी खेळ! 3 दिवसापूर्वी उद्घाटन, विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या कठड्यांना तडे, गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पूल पूर्ण होण्याआधीच आणि तांत्रिक त्रुटी कायम असताना घाईघाईने केलेल्या उद्घाटनावरून पुणेकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे
पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नुकताच विद्यापीठ चौक ते औंध-शिवाजीनगर दुमजली उड्डाणपुल उभारण्यात आला आहे. 3 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र, आता लगेचच या पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूल पूर्ण होण्याआधीच आणि तांत्रिक त्रुटी कायम असताना घाईघाईने केलेल्या उद्घाटनावरून पुणेकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संरक्षण कठड्यांना पडलेले क्रॅश, खांबांवरील तडे आणि रस्त्यातील जीवघेणे खड्डे यामुळे हा पूल नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचं म्हटलं आहे.
तांत्रिक त्रुटींचा डोंगर
नगरसेवक सनी निम्हण यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असल्याचे दावे केले जात असले तरी, प्रत्यक्ष रस्ते आणि चेंबरच्या पातळीत मोठी तफावत आहे. बाणेर ते कृषी विद्यापीठ मार्गावर चेंबरचे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. वास्तुविशारद डॉ. विशाखा रगडे यांच्या मते, संरक्षण कठड्यांवरील 'क्रॅश' आणि जॉइंट्समधील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते.
advertisement
उद्घाटनाची घाई का?
काही ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट न करताच आणि तांत्रिक चुकांकडे कानाडोळा करून पुलाचे घाईघाईत उद्घाटन केल्यामुळे 'भोगवटा प्रमाणपत्र' (OC) नसताना ही घाई का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पीएमआरडीएने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्य अभियंत्यांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पुलाच्या दीर्घकालीन टिकाऊपणावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामात झालेली ही ढिलाई पुणेकरांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या त्रुटींची दुरुस्ती होते की पुन्हा एकदा 'जुगाड' करून वेळ मारून नेली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 9:20 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांच्या जीवाशी खेळ! 3 दिवसापूर्वी उद्घाटन, विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या कठड्यांना तडे, गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह









