Mumbai Ac Local : हार्बरवर पुन्हा एसी लोकल धावणार, किती फेऱ्या चालणार, वेळापत्रक कसं असेल?
Last Updated:
Harbour line AC Local Timetable : हार्बर रेल्वे मार्गावर 26 जानेवारीपासून पुन्हा एसी लोकल धावणार आहेत. पण याचे वेळापत्रक कसे असेल ते जाणून घ्या.
नवी मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे काही सामान्य लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने रोजच्या प्रवासावर अवलंबून असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात कधीपासून एसी लोकल धावणार असून याचे वेळापत्रक कसे असेल.
हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा एसी लोकलची एन्ट्री
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी किंवा वडाळा रोड ते पनवेल मार्गावर एकूण 14 एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत.हार्बर मार्गावर यापूर्वी 1 डिसेंबर 2021 रोजी पहिल्यांदा एसी लोकल सुरू करण्यात आली होती. मात्र सामान्य लोकलच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट आणि पास दर अधिक असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळाला. त्याचबरोबर एसी लोकलसाठी काही सामान्य लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली होती. अखेर त्या काळात हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
advertisement
कोणत्या वेळेला आणि किती फेऱ्या असणार?
आता नव्या नियोजनानुसार गर्दीच्या वेळेत धावणाऱ्या तीन सामान्य लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी 9.09 ची पनवेल-सीएसएमटी तर सायंकाळी 5.30 ची वडाळा रोड-पनवेल आणि रात्री 8 वाजताची सीएसएमटी-पनवेल ही सेवा एसी लोकलने बदलली जाणार आहे.
सोमवार ते शनिवार या काळात वाशी-वडाळा रोड, सीएसएमटी-पनवेल, सीएसएमटी-वाशी आणि वडाळा रोड-पनवेल या मार्गांवर सात अप आणि सात डाउन अशा एकूण 14 एसी लोकल धावतील. रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी एसी लोकल बंद राहतील आणि त्याऐवजी सामान्य लोकल सुरू राहतील.
advertisement
दरम्यान पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर चर्चगेट ते विरार मार्गावर 12 ते 14 अतिरिक्त एसी लोकल सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे 26 जानेवारीपासून हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर वाढीव एसी लोकल सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 8:30 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Ac Local : हार्बरवर पुन्हा एसी लोकल धावणार, किती फेऱ्या चालणार, वेळापत्रक कसं असेल?









