कॉफी प्यायल्यानंतर ऊर्जावान आणि ताजेतवाने वाटते हे खरं असंल तरी रिकाम्या पोटी कॉफी पिणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पचक्रियेवर परिणाम होतो आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते. यामुळे तुमचे शरीराच्या पोषक तत्वांचे शोषण करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. परिणामी तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ शकते आणि तुम्हाला सतत आजारांचा सामना करावा लागू शखतो. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात हे या लेखातून जाणून घ्या.
advertisement
चिंता आणि अस्वस्थता : कॅफिन हा एक उत्तेजक पदार्थ आहे. कॉफीचे सेवन केल्याने शरीराला त्वरीत उर्जा मिळते आणि काही वेळासाठी ताजेतवाने वाटू लागते. परंतु रिकाम्या पोटी ती प्यायल्याने त्याचा विपरित परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे तुमची चिंता, अस्वस्थता आणि तणाव वाढू शकतो. यामुळे तुमच्या दैनंदिन कामात व्यत्यय येऊ शकतो आणि अस्वस्थेमुळे तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करण्यास अडचण येऊ शकते.
पोटातील अॅसिडिटीचा धोका : कॉफीमध्ये ॲसिड असते. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पोटात ॲसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते. कॅफीन आणि ॲसिड यांच्या मिश्रणाने पोटाच्या आतड्यांवर ताण येऊ शकतो. परिणामी पोटत वेदना, छातीत जळजळ आणि ॲसिडीटीची समस्या निर्माण होऊ शकते. तुमचे हेच रुटिन कायम राहिल्यास कालांतराने तुम्हाला गॅस्ट्र्रिटिस किंवा पेप्टिक अल्सर यासारख्या गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो.
पोषक तत्व शोषणात अडथळा : कॉफीमध्ये टॅनिन नावाची संयुगे असतात जी शरीरात आयर्न आणि कॅल्शियमसह इतर काही पोषक घटकांच्या शोषणात अडथळा आणतात. यामुळे तुमच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. हे अशा व्यक्तींसाठी विशेष चिंतेचे कारण आहे जे एखाद्या आजारातून बरे होण्यासाठी पोषक तत्व असलेल्या आहारावर अवलंबून असतात.
तणाव : कॅफिन शरीरात कॉर्टिसॉल (स्ट्रेस हार्मोन) उत्तेजित करते. त्यामुळे सतत कॉफी प्यायल्याने याची पातळी वाढू शकते आणि त्याचे आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. यामुळे कमकुवत प्रतिकारशक्ती, वजन वाढणे आणि मूडचे विकार होऊ शकतात. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने जास्त ताणतणाव निर्माण होऊ शकतो. यामुळे तणाव आणि त्यासंबंधित परिस्थिती बिघडू शकते.
रक्तातील साखरेची अनिश्चित पातळी : कॅफिन इंसुलिन संवेदनशीलता आणि ग्लुकोज चयापचय प्रभावित करू शकते. त्यामुले रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास रक्तातील साखरेमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. ही परिस्थिती खूप धोकादायक देखील असू शकते. कालांतराने यामुळे टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)