महिलांच्या शरीरात वेळोवेळी हार्मोनल बदल होतात, आणि त्यामुळे काही आजारांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक असतं. पण जेव्हा ही लक्षणं ओळखूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, तेव्हा हे जास्त त्रासदायक ठरलं.
चला जाणून घेऊया अशाच पाच आरोग्य समस्या, ज्या सुरुवातीला सामान्य वाटतात, पण वेळेवर लक्ष न दिल्यास शरीरासाठी घातक ठरू शकतात.
1. थायरॉईड विकार
advertisement
थायरॉईड ग्रंथीतील असंतुलनामुळे हायपोथायरॉईड (थकवा, वजन वाढणं) किंवा हायपरथायरॉईड (वजन कमी होणं, घाम येणं) सारखे विकार होतात. केस गळणं, मूडमध्ये बदल, मासिक पाळी अनियमित होणं ही लक्षणं सहसा दुर्लक्ष केली जातात. पण हे विकार संपूर्ण शरीरावर परिणाम करू शकतात.
2. ऑस्टिओपोरोसिस (हाडांची झीज)
मेनोपॉजनंतर कॅल्शियमची कमतरता झाल्याने महिलांची हाडं कमजोर होतात. यामुळे पाठीचे दुखणं, उगीचच हाडं तुटणं किंवा फ्रॅक्चर होणं सुरू होतं. योग्य आहार आणि सूर्यप्रकाशात वेळ घालवणं यामुळे हाडं मजबूत ठेवता येतात.
3. हृदयविकार
हृदयविकार हे पुरुषांचं आजार नाही. महिलांनाही ते होतो, पण लक्षणं वेगळी असतात. उदाहरणार्थ, थकवा, श्वास घ्यायला त्रास, जबड्यात किंवा पाठीमध्ये वेदना. म्हणूनच वेळेवर तपासणी आणि जागरूकता गरजेची आहे.
4. मानसिक आरोग्याचे विकार (डिप्रेशन आणि ऍन्क्झायटी)
भावनिक ओझं, जबाबदाऱ्या आणि शरीरातील हार्मोनल बदल यामुळे महिलांमध्ये मानसिक तणाव अधिक आढळतो. झोप न लागणं, काहीच चांगलं न वाटणं, चिडचिड होणं ही लक्षणं दिसतात. मानसिक आरोग्यासाठी मदत घेणं ही कमजोरी नाही, तर सजगतेची निशाणी आहे.
5. अॅनिमिया (रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता)
अॅनिमिया ही महिलांमध्ये सर्वात सामान्य समस्या आहे. मासिक पाळी, गर्भधारणा आणि अन्नातून पुरेसं आयर्न न मिळाल्याने ही समस्या उद्भवते. सतत थकवा जाणवणं, चक्कर येणं, श्वास लागणं ही लक्षणं असू शकतात. अॅनिमियावर उपचार न घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आपलं शरीर काही ना काही संकेत देत असतं, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. लक्षणं ओळखा, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा. कारण ‘तुमचं आरोग्य’ हे तुमचा खरा दागिना आहे.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहचवण्याचा आहे.)