महाराष्ट्रातील गोड पदार्थ म्हटला की बहुतेकांच्या तोंडावर पुरणपोळीचं नाव येईल. पण पुरणपोळीशिवाय आणखी एक जुना गोड पदार्थ म्हणजे सुधारस. जो अगदी कमी साहित्यात बनतो आणि बनवायलाही सोपा आहे. सुधारस नाव वाचूनच हा पदार्थ काय आहे, कसा दिसतो, त्याची चव चाखायची उत्सुकता वाढली असेल ना? चला तर मग आता थेट रेसिपीकडे वळुयात.
advertisement
सुधारससाठी लागणारं साहित्य
दोन वाटी साखर
मोठं एक लिंबू, छोटे असतील तर दोन लिंबू घ्या
वेलची पूड
पाणी
सुधारस कसा बनवायचा?
ज्या पातेल्यात सुधारस करायचा आहे, त्यात साखर घ्या. त्यात पाणी घ्या. दोन वाटी साखरेसाठी अडीच वाटी पाणी असं प्रमाण घ्या. भांडं गॅसवर ठेवा आणि साखर पाण्यात विरघळून घ्या. एरवी आपण साखरेचा पाक बनवताना एक तारी, दोन तारी अशा तारी बघतो. पण सुधारससाठी तार वगैरे काही बघायची नाही. साखर पाण्यात फक्त विरघळेल इतकंच बघा. उकळी काढा, थोडा रस घट्ट झाला पाहिजे.
Puri Recipe Video : कडाकणी... नाव कडक पण कुरकुरीत आणि चवीला गोड पदार्थ, बनवायलाही सोपी
आता भांडं गॅसवरून खाली घ्या. आता यात लिंबूरस, वेलची पूड टाका. आवडत असेल तर केसरही टाकू शकता, नीट ढवळून घ्या. थंड झाला की आणि थोडा घट्ट होईल. आता हे खायचं कशासोबत तर पोळी आणि पुरी दोन्हीसोबत छान लागतो. जसं आपण ब्रेड-जाम, जाम आणि पोळी वगैरे खातो अगदी तसंच खायचं.
झटपट होणारा हा असा पारंपारिक गोड पदार्थ अगदी साधासोपा. जो पाहून अनेकांना वाटेल हे कसलं गोड. पण आजीने सांगितलं की, आता जशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आहेत पूर्वी तशा नव्हत्या. मग गोड म्हटलं की घरोघरी सुधारसच केला जायचा. तेव्हा याला खूप महत्त्व होतं. लग्नात श्रीमंत पूजन असतं त्याच्या आदल्यादिवशी हा पदार्थ हमखास केला जातो.
Smita Oak vlogs युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
शेफ विष्णू मनोहर यांनीही त्यांच्या युट्युबवर ही रेसिपी आणखी थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे. त्यांनी यात दूध, केसर, काजूचाही वापर केला आहे. ती रेसिपी पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
तुम्हाला सुधारस माहिती होता का? तुम्ही कधी सुधारसची चव चाखली आहे का? नाहीतर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
