वर्धा: देशभरात तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या काळात उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासाला, समस्यांना किंवा विकारांना सगळ्यांना सामोरे जावे लागते. उष्णता वाढल्याने आरोग्याविषयी समस्या देखील वाढू लागतात. अशा परिस्थितीत उष्णतेपासून बचावासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय उपयोगी ठरतात. याबाबत वर्धा येथील आयुर्वेदिक डॉ. मयूर कातोरे यांनी माहिती दिलीय.
advertisement
उष्णतेमुळे उद्भवतात समस्या
सूर्याची प्रखर किरणे आणि अति कोरडी हवा याने शरीरातील जलीय अंश कमी होतो. त्यामुळे उन्ह लागणे, ताप, लघवीला जळजळ, उष्णता वाढणे, थकवा, ग्लानी, उत्साह कमी होणे, नाकातून रक्त येणे, छातीत जळजळ, जुलाब-हगवण आदी तक्रारींना समोरे जावे लागते. या काळात शरीराला आतून शीतल ठेवण्यासाठी काही घरगुती आयुर्वेदिक उपाय लाभदायी ठरतात.
उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड फळे खाणं योग्य की अयोग्य? पाहा आहारतज्ज्ञांचा सल्ला
उष्माघातावर घरगुती उपाय
1. गुलकंद, आवळ्याचा मुरंबा, पेठा सकाळी उपाशी पोटी खावे. 2. फळांमध्ये टरबूज, खरबूज, संत्रे, मोसंबी, डाळिंब, आंबा खाणे लाभदायक ठरते. 3. कोकम, लिंबू आदींचे सरबत, नारळ पाणी, ताक, पुदिना सरबत, धन्याचे पाणी आवर्जून प्यावे. 4. खजूर, काळी मनुका, खडीसाखर पाण्यात भिजवून ते पाणी पिल्याने उष्णता कमी होते. 5. माठात वाळा/खसचे मूळ टाकणे. घराबाहेर पडण्या आधी 1 ग्लास पाणी प्यावे.
6. अंघोळीनंतर दोन्ही नाकपुडीला आतून खोबरेल तेल करंगळीने लावणे. 7. नाकातून रक्त येत असता दुर्वा रस 3-3 थेंब नाकामध्ये टाकावा. 8. डोळ्यांची आग झाल्यास कोरफड (अलोवेरा) गर डोळ्यावर ठेवणे. 9. स्किन टॅनिंग रोखण्यासाठी सन स्क्रीन लोशन लावावे. 10. पांढऱ्या दुपट्ट्याने चेहरा, कान, डोके झाकून उन्हात बाहेर पडावे.
कोल्हापूरच्या महिलेचा अनोखा फंडा, आता कोणतीही भाजी बनणार फक्त 2 मिनिटांत
11. डायरिया झाल्यास अर्धा चमच सितोपलादी चूर्ण घ्यावे. ORS पाणी, आंबील, कैरीचे पन्हे आदी घ्यावे. 12. जेवणात जुने गहू-जुने तांदूळ, गायीचे तूप, सत्तू, धने या सारखे शीतल, थंड, शक्तिवर्धक पदार्थ वापरावे.
हे पथ्य पाळाच
उन्हाळ्यात अति तिखट, हिरवी मिरची, शिळे अन्न, अति चहा-कॉफी, मसालेदार, तळलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स टाळावेत, असे डॉ मयूर कातोरे सांगतात. सध्याच्या काळात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उष्माघात किंवा उष्णतेच्या समस्यांवर उपाय म्हणून डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेवून काळजी घेणे गरजेचे आहे.