खरगोन : कुत्रा भुंकल्यावर भल्याभल्यांना घाम फुटतो. कुत्रा चावण्याची भिती सर्वांनाच वाटते कारण त्यातून रेबीजसारखा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तुम्हाला माहितीये का, कुत्र्याप्रमाणेच मांजर चावण्याकडेही अजिबात दुर्लक्ष करू नये. नाहीतर अगदी जीवावरही बेतू शकतं. याबाबत डॉक्टर काय सांगतात, जाणून घेऊया.
advertisement
कुत्रा चावल्यावर आपण ताबडतोब डॉक्टरांकडे धाव घेतो. त्याप्रमाणेच मांजर चावल्यावरही ताबडतोब डॉक्टरांकडे जावं, मांजर रानटी असली किंवा पाळीव असली तरीही. मांजरीच्या हल्ल्यानंतर रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घेणं आवश्यक असतं. डॉक्टर स्वप्निल श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
डॉक्टरांनी सांगितलं की, कुत्रा चावल्यास रेबीजचं इजेक्शन घेतात जेणेकरून इन्फेक्शन पसरू नये. त्याचप्रमाणे मांजर चावणंही हलक्यात घेऊ नये. कारण जर ती मांजर एखाद्या आजारानं ग्रस्त असेल तर आपल्यालाही तो आजार होऊ शकतो. मांजरीला संक्रमित कुत्रा चावला असेल, तर त्याचा त्रास आपल्यालाही सोसावा लागू शकतो.
डॉक्टर सांगतात की, सामान्यपणे लोक मांजर चावणं फार हलक्यात घेतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. जे अजिबात योग्य नाहीये. मांजर चावल्यामुळे 'हायड्रोफोबिया' नावाचा आजार होऊ शकतो. जो अतिशय धोकादायक मानला जातो. या आजाराचा प्रभाव तेव्हा जास्त होतो जेव्हा मांजर आधीपासून रेबीज संक्रमित असेल. त्यामुळेच मांजर चावल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे.
जेवढं कुत्र्यात रेबीज इन्फेक्शन राहू शकतं, तेवढंच मांजरीतही राहू शकतं, असं डॉक्टर सांगतात. म्हणून मांजर चावल्यानंतरही रेबीजचं इंजेक्शन घ्यावं. दरम्यान, मांजर चावल्यानंतर ती जखम 5 ते 10 मिनिटं वाहत्या पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यावी. जेणेकरून विषाणूंचा प्रभाव कमी होईल. मग घरात उपलब्ध असलेलं मलम त्यावर लावावं. त्यानंतर जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे. डॉक्टर सांगतात की, कुत्रा चावल्याप्रमाणेच मांजर चावल्यानंतरही 4 ते 5 इंजेक्शन दिले जातात. साधारण पहिल्या, तिसऱ्या, सातव्या आणि अठ्ठाविसाव्या दिवशी हे इंजेक्शन रुग्णाला देतात.
