आरोग्यविषयक चिंता आणि वाढत्या जागरूकतेमुळे लोक हळूहळू आहारातून साखर दूर करत आहेत. कारण साखरेमुळं वजन तर वाढतेच, शिवाय अनेक आजारांचा धोकाही उद्भवतो. अशावेळी चहा गोड करण्यासाठी नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय आवश्यक झाले आहेत. तुम्हालाही चहात साखर नको असेल आणि बिनसारखरेचा पण गोड चहा हवा असेल तर तुम्ही काही नैसर्गिक पर्यायांचा विचार करू शकता. यात कॅलरीज कमी असतात आणि ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात.
advertisement
साखरेचे नैसर्गिक पर्याय..
कोकोनट शुगर : कोकोनट शुगर सध्या लोकप्रिय होत आहे. ही साखर नारळाच्या रसापासून बनवली जाते आणि तिला गुळासारखी सौम्य गोड चव असते. चहामध्ये ही साखर घातल्यास चहा गोड तर होतोच, शिवाय त्याला एक नैसर्गिक चवही येते. कोकोनट शुगरचा ग्लायसेमिक इंडेक्स साध्या साखरेपेक्षा कमी असतो. यामुळं साखरेची पातळी अचानक वाढत नाही. ज्यांना साखर कमी करायची आहे, पण चहा गोड हवाय ते हा पर्याय ट्राय करू शकतात.
स्टीव्हिया : नैसर्गिक गोडवा हवा असेल तर स्टीव्हिया हा एक लोकप्रिय पर्याय आहे. स्टीव्हिया ही एक वनस्पती असून तिच्या पानांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. स्टीव्हिया साखरेपेक्षा कित्येक पटीने गोड असते आणि त्यात कॅलरीजही जवळजवळ नसतातच. अनेक लोक याची पानं वाळवून त्याची पावडर वापरतात. स्टीव्हिया गोळ्या आणि द्रव स्वरूपातही उपलब्ध आहे. विशेष म्हणजे तो मधुमेहींसाठी देखील सुरक्षित मानलाजातो. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही गोडाची इच्छा भागवण्यासाठी याचा विचार करू शकता.
मंक फ्रूट : गोड चवीसाठी मंक फ्रूट हा देखील एक चांगला पर्याय आहे. चीन आणि इतर देशांमध्ये मंक फ्रूटचा वापर पूर्वीपासून होत आहे. ही साखर वनस्पतींपासून बनवली जाते आणि ती सामान्य साखरेपेक्षा अधिक गोड असते. अनेक विदेशी खाद्यपदार्थांमध्ये मंक फ्रूटचा वापर केला जातो. विशेष म्हणजे ते स्टीव्हियाप्रमाणेच जवळजवळ कॅलरी-मुक्त असते आणि त्याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाहीत.
मध : तुम्ही सहज उपलब्ध होणारे आणि पूर्णपणे नैसर्गिक आणि पारंपरिक पर्याय शोधत असाल तर मध आणि गूळ उत्तम आहेत. चहा थोडा थंड झाल्यावर तुम्ही त्यात मध घालून पिऊ शकता. असे केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होत नाहीत. मधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
गूळ : तुम्ही चांगल्या आरोग्यासाठी गुळाचा चहा देखील पिऊ शकता. गुळामध्ये आयर्न, मिनरल्स आणि नैसर्गिक गोडवा भरपूर प्रमाणात असतो. यामुळं चहाची चव वाढते. गुळाचा चहा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. अनेक चहाप्रेमी आता गोडव्यासाठी साखरेऐवजी गुळाकडे वळले आहेत.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
