मुंबई : उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाचा परिणाम केवळ माणसांवरच नाही तर झाडांवरही होतो. उन्हाळा आला की झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते, विशेषतः तुळशीची. तुळस केवळ धार्मिक महत्त्वासाठीच नव्हे तर तिच्या औषधी गुणधर्मांसाठीही ओळखली जाते. पण उन्हाच्या तीव्र झळांमुळे तुळशीचे पान गळू लागतात आणि योग्य काळजी न घेतल्यास ती वाळू शकते. चला तर मग, तुळशीला उन्हाळ्यात तजेलदार ठेवण्यासाठी सोप्या पण प्रभावी टिप्स जाणून घेऊया.
advertisement
तुळशीला उन्हाळ्यात चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काय करावे?
पाणी व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर आणि सावलीची व्यवस्था ही मुख्य सूत्रे आहेत. उन्हाळ्यात तुळशीला दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. मात्र, मुळांना पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कुंडीच्या तळाला छिद्र असल्यास पाणी सहज वाहून जाते. उन्हाच्या थेट संपर्कात तुळशीला ठेवल्यास पाने करपण्याची शक्यता असते. त्यामुळे तिला अर्धसावलीत किंवा ग्रीलवर ठेवल्यास फायदा होतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात तुळशीला ठेवणे फायदेशीर असते.
गायीचे शेणखत, कंपोस्ट किंवा घरगुती ओल्या कचऱ्यापासून तयार केलेले खत तुळशीसाठी सर्वोत्तम मानले जाते. पण शहरी ठिकाणी या गोष्टी सहसा मिळणं कठीण आहे त्यामुळे बाजारातील खताचा वापर करा. दर 15 दिवसांनी हलकं खत दिल्यास तुळशीला पोषण मिळतं.
उन्हाळ्यात तुळशीला पांढरी माशी, मावा किंवा फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून लसणाचा अर्क किंवा निंबोळी तेलाचा फवारा मारू शकतो. तसंच वाढलेल्या किंवा कोरड्या पानांची छाटणी केल्याने झाड निरोगी राहते. आठवड्यातून एकदा शक्य झाल्यास तुळशीची माती सैल करा. यामुळे तुळशीच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो. उन्हाळ्यात थोडीशी अतिरिक्त काळजी घेतल्यास तुळस दीर्घकाळ हिरवीगार आणि तजेलदार राहते. तुळशी केवळ पूजेसाठीच नाही तर वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी आणि औषधी गुणधर्मांसाठीही उपयुक्त ठरते.





