जाणून घेऊयात सतत स्क्रिनसमोर राहण्याचे तोटे
डिजिटल आय स्ट्रेन
गेल्या काही वर्षांत, टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड क्रांती झालीये. टिव्ही, मोबाईल फोन किंवा लॅपटॉप अगदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेत.त्यामुळे त्यांचा वापर प्रचंड वाढलाय. अगदी 5-6 महिन्याच्या मुलापासून ते वयोवृध्द व्यक्ती उशीरापर्यंत मोबाईलचा वापर करताना दिसतात. या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा दीर्घकाळ वापर केल्याने डोळ्यांवर विपरीत परीणाम होतो ज्याला शास्त्रीय भाषेत कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा डिजिटल आय स्ट्रेन म्हटलं जातं. डोळे दुखणे, डोळ्यांची जळजळ किंवा रात्री उशीरापर्यंत झोप न येणे ही डिजिटल आय स्ट्रेनची काही प्रातिनिधिक लक्षणं आहेत.
advertisement
सर्वात विपरीत परीणाम कोणावर?
सध्या प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटर आणि मोबाईलचा वापर वाढलाय. त्यामुळे जी व्यक्ती प्रमाणाबाहेर किंवा सलग 2 तासांपेक्षा जास्त डिजीटल स्क्रिनचा वापर करत असेल अशा व्यक्तींना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा डिजिटल आय स्ट्रेनचा त्रास होऊ शकतो.
हे सुद्धा वाचा :डायबिटीजमुळे जाऊ शकते दृष्टी! डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामुळे जर तुम्हाला डिजीटल स्क्रिनचा वापर टाळणं शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांची काळजी अधिक जास्त प्रमाणात घ्यावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला 20-20-20 नियमाचं पालन करावं लागेल.
काय आहे 20-20-20 नियम ?
प्रत्येक 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे पहा. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल. जर तुम्ही सतत स्क्रिनसमोर असाल तर स्क्रीनवर काम करताना डोळे अधून मधून मिचकावत राहा. यामुळे डोळ्यांना कोरडेपणा येणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात तिथे पुरेसा सूर्यप्रकाश किंवा प्रकाश असेल याची काळजी घ्या. डोळे आणि स्क्रीनचं अंतर आणि उंची योग्य ठेवा. दर तासाला 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या. डिजीटल स्क्रिनमधून निघणाऱ्या किरणांमुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी अँटीग्लेअर चष्म्याचा वापर करा.