बिअर प्यायल्याने मुतखडा निघून जातो, असा समज लोकांमध्ये पाहायला मिळतो. तसेच ज्या व्यक्ती बिअर पितात त्यांना किडनी स्टोन होत नाही, असा देखील समज आहे. नुकत्याच एका हेल्थ कंपनीने किडनी स्टोन बाबत एक सर्व्हे केला त्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. यानुसार, बिअर प्यायल्याने किडनी स्टोन बरा होता, असं प्रत्येक तिसऱ्या भारतीय नागरिकाला वाटतं. या सर्व्हेत सुमारे एक हजार लोक सहभागी झाले होते. त्यापैकी 50 टक्के लोकांवर सहा महिन्यांपासून किडनी स्टोन बरा होण्यासाठी उपचार केले जात होते. बिअरमुळे किडनी स्टोनचा आजार बरा होऊ शकतो, असं यापैकी बहुतेकांचे मत होते. याविषयी तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.
advertisement
किडनी स्टोन ही खरं तर सामान्य समस्या आहे. हा स्टोन लहान खड्यांपासून तयार होतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला शरीराच्या खालील भागात तीव्र वेदना जाणवू लागतात. तसेच यूरिन पास करताना त्रास होतो. किडनीत अनेक घटक जमा होऊ लागतात. हे खड्यांच्या स्वरुपात जमा होतात आणि काही कालावधीनंतर ते त्रासदायक ठरतात.
बिअर आणि व्हिस्की एकत्र करून पिताय? अल्कोहोल मिक्सिंगचा काय होतो परिणाम!
किडनी स्टोनच्या समस्येवर बिअर पिणं हा उपचार फायदेशीर ठरू शकतो, असं बहुतांश लोकांचं मत आहे. कोणताही विचार न करता लोक हा उपचार करतात. दिल्लीतील वरिष्ठ फिजिशियन डॉ. कमलजितसिंग कँथ यांनी सांगितले की, ``वैद्यकशास्त्रात याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. किडनी स्टोनचा आकार जर 6 mmपेक्षा कमी असेल तर लिक्विड डाएट घेतल्याने तो बाहेर निघून जाण्याची शक्यता असते. जर किडनी स्टोनचा आकार वाढला असेल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.``
सफदरजंग हॉस्पिटलचे दीपक कुमार सुमन यांनी सांगितले की,``बिअर प्यायल्याने किडनी स्टोन निघून जातो, हा समज लोकांच्या सोयीनुसार तयार झाला आहे. जास्त प्रमाणात लिक्विड डाएट घेतल्याने किडनीवर दबाव येतो आणि स्टोन बाहेर पडू शकतो. पण बिअर प्यायल्याने स्टोन बाहेर पडेलच असं नाही.``
बिअर प्यायल्याने किडनी स्टोन बाहेर पडतो हा चुकीचा समज ठरू शकतो. बिअर किंवा दारूमुळे युरिनचे उत्पादन वाढते, पण त्यामुळे स्टोन बाहेर पडेलच असे नाही. तज्ज्ञांच्या मते, मद्यपानाच्या व्यसनामुळे शरीरात डिहायड्रेशन वाढते. त्यामुळे स्टोनची समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकते. तसेच दारू किंवा बिअरच्या व्यसनामुळे किडनी आणि लिव्हरवर दुष्परिणाम होऊ शकतो. या दोन्ही अवयवांवर विपरित परिणाम झाल्याने शरीरातील इतर अवयवांवर दबाव वाढू लागतो. त्यामुळे किडनी स्टोन आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. बिअर पिण्यासारख्या उपचारांमुळे आजार बरा होण्याऐवजी बळावू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, पाणी कमी प्रमाणात प्यायल्यास पुरेशा प्रमाणात युरिन तयार होत नाही. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. याशिवाय आहारात जास्त मीठ, प्रोटीनयुक्त पदार्थ, टोमॅटोच्या बिया आणि काही फळांमुळे किडनी स्टोन होऊ शकतो. या आजारावर मनानं उपचार करण्याऐवजी वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे.
