तुम्ही किचन स्वच्छ करताना काउंटरटॉप्स, गॅस स्टोव्ह आणि फरशी रोज स्वच्छ करता. परंतु काही जागा अशा असतात ज्याकडे दुर्लक्ष होतं किंवा त्या लक्षात येत नाहीत. याच जागा तुमच्या आरोग्यार विपरित परिणाम करू शकतात. हे कोपरे नियमित स्वच्छ करणं अतिशय गरजेचं असतं, अन्यथा ते आजारांचे कारण बनू शकतात.
सिलिंडरची जागाही स्वच्छ ठेवा
advertisement
बहुतांश घरांमध्ये गॅस सिलेंडरची जागा कायम दुर्लक्षित असते. हे सिलिंडर बऱ्याच घरांमध्ये किचन काउंटरखाली असते. किचनची साफसफाई करताना बहुतेकवेळा त्याकडं दुर्लक्ष होतं. किंवा सिलिंडरच्या अवतीभोवती असलेल्या रिकाम्या जाग्यात अनेकजण घरातील इतर वारंवार वापरात नसलेल्या वस्तू ठेवतात. यामुळे ती जागा फारशी स्वच्छ केली जात नाही. सिलेंडर जड असल्यामुळं लोक ते काढून ती जागा स्वच्छ करण्याचा कंटाळा करतात. परंतु सिलिंडरभोवती साचलेली धूळ आणि तेलकट थर हळूहळू घाण वाढवतो आणि तेथून दुर्गधी देखील यायाला सुरुवात होते. त्यामुळे किचन स्वच्छ करताना सिलिंडरची जागाही नक्की स्वच्छ करा.
कॅबिनेटचे दरवाजे आणि हँडल
किचनमधील खालच्या कॅबिनेटचे दरवाजे आणि हँडल याकडे देखील अनेकदा दुर्लक्ष होतं. किचनमधील वरच्या कॅबिनेटच्या तुलनेत खालचे अधिक वापरात असतात आणि ते खराब होण्याची शक्यता देखील अधिक असते. कॅबिनेटच्या दरवाज्यांवर धूळ आणि जंतू जमा होऊ शकतात. त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे हे भाग देखील कायम स्वच्छ करणं गरजेचं असतं. किचनमधील हे दुर्लक्षित कोपरे तुम्ही स्वच्छ ठेवले तर अनेक प्रकाच्या समस्या टाळता येऊ शकतात.
मसाल्यांचा डबा कायम स्वच्छ ठेवा
किचनमधील तिसरी आणि अतिशय जागा म्हणजे मसाल्यांचा डबा असतो. मसल्यांच्या नियमित वापर होत असला तरी ते ठेवण्याचा डब्बा आपण नियमित स्वच्छ करत नाही. या डब्यात आणि त्याच्या कप्प्यांमध्ये साचलेली पावडर स्वच्छ करायला आपण विसरतो. कधीकधी त्यात पाण्याचे शिंतोडे उडाल्याने ओलसरपणा देखील जागा घेतो. यामुळे तुमचे मसाले खराब होऊ शकतात. मसाल्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी डब्याचे सर्व कप्पे काढून डबा धुऊन उन्हात वाळवा आणि नंतर तो पुन्हा वापरा.
मायक्रोवेव्हचा आतील भाग
मायक्रोवेव्हच्या आतील भागाकडंही अनेकदा दुर्लक्ष होतं. बाहेरून स्वच्छ दिसणारा मायक्रोवेव्ह करीच्या शिंतोड्यांनी आणि अन्नपदार्थांच्या डागांनी खराब होऊ शकतो. बाराच काळ तो स्वच्छ केला नाही तर त्यामधून दुर्गंध येऊ शकतो. तसेच जिवाणूंची वाढ देखील त्यात होऊ शकते. त्यामुळं मायक्रोवेव्हचा आतील काळजीपूर्वक स्वच्छ करणं गरजेचं असतं.
डबे ठेवण्याचा शेल्फ स्वच्छ ठेवा
किचनमधील पीठ, तांदूळ, डाळी आणि साखर यांसारख्या कोरड्या वस्तू किंवा किराणा माल तुम्ही स्टील किंवा प्लास्टिकच्या डब्यांमध्ये सुरक्षित ठेवता. परंतु ज्या शेल्फवर किंवा रॅकमध्ये हे डबे ठेवलेले असतात त्यावर अनेकदा धान्याचे कण आणि धूळ साचते. त्याकडं अनेकजण दुर्लक्ष करतात किंवा सतत स्वच्छ करत नाहीत. यामुळं तिथे मुंग्या आणि झुरळं आकर्षित होतात. त्यांचा वावर रोखण्यासाठी कायम तुमच्या किचनमधील डबे ठेवण्याचा शेल्फ स्वच्छ ठेवा. रेल्फ स्वच्छ करताना तो पूर्णपणे रिकामा करा आणि ती जागा निर्जंतुक करा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
