सध्या ग्लासमध्ये धूर निघणारी रंगीबेरंगी पेये पाहणं खूप कौतुकाचं मानलं जातं. हे ड्रिंक्स हातात धरून फोटो काढणं किंवा व्हिडिओ बनवणं एक स्टेटस सिम्बॉल बनलं आहे. आपण असं काहीतरी ट्राय केलं आहे आणि ते सर्वांनी पाहावं असं सगळ्यांना वाटतं आणि म्हणून ते देखील असं काहीतरी ट्राय करण्यासाठी आपोआपच ओढले जातात.
पण, हाच दिखावा कधी कधी जीवावर बेतू शकतो, याचा विचार आपण करतो का? रशियामधून समोर आलेल्या एका भयंकर घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. केवळ स्टाईल मारण्याच्या नादात एका व्यक्तीच्या आयुष्याचं कसं होत्याचं नव्हतं झालं, ही घटना प्रत्येकासाठी डोळे उघडणारी आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
रशियाची राजधानी मॉस्को येथे एका कॉर्पोरेट पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहुण्यांना आकर्षित करण्यासाठी तिथे एका 'मिक्सोलॉजिस्ट'ला (कॉकटेल बनवणारा तज्ज्ञ) बोलावण्यात आलं होतं. हा तज्ज्ञ 'लिक्विड नायट्रोजन' (Liquid Nitrogen) वापरून अतिशय आकर्षक आणि धूर निघणारे कॉकटेल्स बनवत होता. लिक्विड नायट्रोजनमुळे ड्रिंक पटकन थंड होतं आणि त्यातून पांढरा दाट धूर निघतो, जो दिसायला खूपच 'कुल' वाटतो.
तिथे उपस्थित असलेल्या 38 वर्षीय एका व्यक्तीने असं एक ड्रिंक घेतलं. जसा त्याने त्या ड्रिंकचा घोट घेतला, तसा त्याच्या तोंडातून नायट्रोजनचा धूर बाहेर येऊ लागला. पण, काही सेकंदांतच आनंदाचं रूपांतर किंकाळ्यांमध्ये झालं. तो व्यक्ती वेदनेने जमिनीवर कोसळला.
पोटात झाला स्फोट: मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही थक्क
त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आलं. लिक्विड नायट्रोजन पोटात गेल्यामुळे त्या व्यक्तीचं पोट फाटलं होतं. लिक्विड नायट्रोजन हे उणे 196 अंश सेल्सिअस इतकं थंड असतं. जेव्हा ते शरीराच्या आत जातं, तेव्हा ते वेगाने वायूत रूपांतरित होतं आणि प्रचंड दाब निर्माण करतं. याच दाबामुळे त्या तरुणाचं पोट आतून फाटलं. डॉक्टरांना त्याचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने मोठी शस्त्रक्रिया करावी लागली.
चूक कोणाची? मिक्सोलॉजिस्ट की युजर?
लिक्विड नायट्रोजनचा वापर खाद्यपदार्थांमध्ये करणं बेकायदेशीर नाही, पण तो वापरताना अत्यंत कडक नियम पाळवे लागतात. जोपर्यंत त्यातील धूर पूर्णपणे निघून जात नाही आणि नायट्रोजन हवेत विरत नाही, तोपर्यंत ते पिणं किंवा खाणं मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. या प्रकरणात, बारटेंडरने ग्राहकाला ही सूचना दिली नव्हती, की धूर पूर्णपणे थांबल्याशिवाय हे पेये पिऊ नका.
तुम्ही पार्टीत जाताना 'ही' काळजी घ्या:
1. धूर निघणारे पदार्थ टाळा: जर तुम्हाला खात्री नसेल की समोरील व्यक्ती तज्ज्ञ आहे, तर अशा 'फॅन्सी' ड्रिंक्सपासून लांब राहा.
2. थेट सेवन नको: लिक्विड नायट्रोजन वापरलेला कोणताही पदार्थ (उदा. ड्रॅगन ब्रेथ कँडी किंवा कॉकटेल) धूर निघत असताना कधीही तोंडात टाकू नका.
3. मुलांना जपा: लहान मुलांच्या बाबतीत अशा गोष्टी अत्यंत घातक ठरू शकतात, कारण त्यांचे अंतर्गत अवयव अधिक नाजूक असतात.
सोशल मीडियावर एखादी गोष्ट भारी दिसते म्हणून ती सुरक्षित असतेच असं नाही. दिखाव्यापेक्षा आपल्या सुरक्षिततेला नेहमीच पहिलं प्राधान्य द्या. ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून ३१ डिसेंबरच्या किंवा इतर कोणत्याही पार्टीत असा अपघात होणार नाही.
