वजन कमी करायचं असेल किंवा शरीरासाठी आवश्यक की प्रोटिन, कार्ब्ज, हेल्दी फॅट, फायबर्स आणि फॅटी ॲसिड्स हवी असतील तर शेंगदाणे हा उत्तम स्रोत मानला जातो. शेंगदाणे शरीराला ऊर्जा देतात. अनेक आजारपणांची तीव्रता कमी ठेवण्यात त्यांची मदत होते. मात्र, तुम्हाला शेंगदाण्यांची ॲलर्जी असेल तर त्यांच्यापासून दूर राहणंच योग्य आहे. नाही तर घसा खवखवणं, त्वचेवर रॅश येणं, पचनाच्या समस्या, श्वास घेताना त्रास होणं असे परिणाम दिसू शकतात.
advertisement
योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ले असता शरीरातील अपायकारक कोलेस्टेरॉल कमी होतं. चांगलं कोलेस्टेरॉल वाढतं. हृदयाचं आरोग्य सुधारतं. डायबेटिस असलेल्यांसाठी
शेंगदाणे हे उत्तम स्नॅक मानले जातात. त्यात अनहेल्दी फॅट नसल्यामुळे ब्लड ग्लुकोज नियंत्रणात राहतं. त्यातील मॅग्नेशियममुळे इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो. शेंगदाण्यांमुळे कोशिकांतील सूज कमी होण्यास मदत होते. काही प्रकारच्या कॅन्सरला रोखण्यासाठी शेंगदाणे उपयुक्त ठरतात. त्यात भरपूर प्रोटिन, व्हिटॅमिन ई असतं. त्यातील पॉलिफेनॉलिक ॲंटिऑक्सिडंट्समुळे कॅन्सर रोखण्यास मदत होते.
ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी शेंगदाणे हे योग्य खाद्य आहे. त्यातील प्रोटीन आणि फायबरमुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. भुक नियंत्रणात राहाते आणि त्यामुळे आपोआपच वजनही नियंत्रणात राहातं. भारतीय स्वयंपाकघरात शेंगदाणे विविध स्वरुपात वापरले जातात. पोहे, उपमा अशा पदार्थांमध्ये शेंगदाणे घातले जातात. कोशिंबिरी, भाज्या आणि उपवासाच्या पदार्थांमध्ये दाण्याचा कूट आवर्जून घातला जातो. शेंगदाणे आणि गूळ यांचा एकत्रित लाडू हा हिमोग्लोबिन वाढवणारा पदार्थ मानला जातो.
मात्र, आहारात अतिरिक्त प्रमाणात शेंगदाणे असतील तर त्याचे दुष्परिणामही शक्य आहेत. लोह, झिंक, मॅंगेनीज, कॅल्शियम रक्तात शोषलं जाण्यात अडथळे येऊ शकतात. पचनाचे त्रास सुरु होऊ शकतात. शेंगदाण्याची ॲलर्जी असेल तर चुकूनही शेंगदाणे खाऊ नये.
