मुंबई : सर्व महिन्यांमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. कारण या महिन्यापासून सणवार सुरू होतात. सणावारानिमित्त घरोघरी गोडाचे पदार्थ बनवले जातात. श्रावण महिन्यातले सोमवार म्हणजे सणावारापेक्षा कमी नसतात. या दिवशी महादेवांना खास नैवेद्य अर्पण केला जातो.
कोकणात दर श्रावणी सोमवारी नारळी भाताचा नैवेद्य बनवण्याची परंपरा आहे. हा भात अतिशय स्वादिष्ट लागतो. गुळाचा अंदाज व्यवस्थित असला तर या भाताची रेसिपी अगदी सोपी आहे. नारळी भात नेमका बनवायचा कसा, जाणून घेऊया.
advertisement
नारळी भातासाठी लागणारे साहित्य :
1 वाटी भिजवलेले तांदूळ
1 वाटी गूळ
1 वाटी तूप
1 वाटी ओलं खोबरं
चवीनुसार लवंग आणि वेलचीपूड
2 वाट्या गरम पाणी
चवीपुरतं मीठ
आवश्यक वाटल्यास खायचा रंग
नारळी भाताची कृती :
सर्वात आधी गॅसवर एक पातेलं ठेवा. थोडं तापलं की त्यात तूप घाला. तुपात लवंग घालून भिजवून घेतलेले तांदूळ परतून घ्या. लवंगाचा गंध आणि तूप तांदळांत छान एकजीव व्हायला हवा. 10 मिनिटांनी या मिश्रणात 2 वाट्या गरम पाणी ओता आणि भाताला वाफ येऊ द्या. 15 मिनिटांनी झाकण काढून भातात ओलं खोबरं आणि गुळ घाला. मग वेलचीपूड घालून भात मिक्स करून घ्या. खायचा रंग असेल तर तो घालून 5 मिनिटं भाताला वाफ येऊ द्या. मग थोडं मीठ घालून भात व्यवस्थित शिजू द्या. अशाप्रकारे नारळी भात तयार आहे. भात सर्व्ह करताना आपण वरून केशर, काजू, बदाम घालू शकता किंवा नुसता भातही उत्तम लागतो.