प्रथिनांचा उत्तम स्रोत
असं म्हटलं जातं की, अंडी आणि कोंबड्यांमध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिनं आढळून येतात. ज्यांचं सेवन करणं आरोग्यासाठी फायद्याचं असतं. मात्र काही डाळींमध्ये प्रथिनांचं प्रमाण हे अंडी आणि कोंबड्यांपेक्षा जास्त आढळून येतं. मूग आणि मसूर डाळ हे त्याचं उत्तम उदाहरण. मात्र काही लोकांना मुगाच्या डाळीची चव आवडत नाही. अशा व्यक्तींसाठी शाकाहारी प्रथिनांचा दुसरा सर्वोत्तम पर्याय म्हणजे मसूर.
advertisement
जाणून घेऊयात मसुराच्या डाळीमध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल आणि त्याच्या फायद्यांबद्दल.
मसुराच्या डाळीत असलेले पोषक घटक
मसुराच्या डाळीत केवळ प्रथिनंच नाहीत तर पोटॅशियम, फायबर, लोह, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, फोलेट अशी जीवनसत्त्वं आणि इतर खनिजंही चांगल्या प्रमाणात आढळून येतात.
मसूर डाळीचे फायदे :
1) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मसूर: मसूर हे वनस्पती आधारित प्रथिन आहे. याशिवाय मसुरात असलेल्या फायबर्समुळे पोट भरलेलं राहतं. त्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही आणि जास्त कॅलरीयुक्त अन्न खाणं टाळलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी मसूर हा उत्तम पर्याय आहे.
2) पचनविकारांवर गुणकारी : मसुरात असलेल्या फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते. गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठते सारख्या आजारांवर मसूर डाळ ही कोणत्या औषधांपेक्षा कमी नाहीये. मसूर डाळीचं वरण किंवा सूप हे अपचन आणि आतड्यांच्या आजारांवर परिणामकारक ठरतं.
3) हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर : मसुराच्या डाळींमध्ये यामध्ये पोटॅशिअम आणि फायबर असल्याने, ते हृदयाच्या आरोग्यासाठीही फायद्याचं ठरतं. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदयविकाराचा धोका टाळता येतो.
4) डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी फायद्याची : मसुराचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे मसूर खाल्ल्यानंतर रक्तात साखर हळूहळू सोडली जाते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी मसूर डाळ खाणं फायद्याचं ठरू शकतं.
5) त्वचा विकारांवर गुणकारी मसुराची डाळ : मसुराच्या डाळीत विविध पोषक तत्त्वांसह व्हिटॅमिन बी कॉप्लेक्स असतं. मसुराच्या डाळीची पावडर किंवा पीठ हे थोडंसं खरखरीत असतं. गेल्या अनेक वर्षापासून या पिठाचा वापर नैसर्गिक स्क्रबर म्हणून केला जातोय. जेव्हा मसूराचं पीठ चेहऱ्यावर लावतो तेव्हा ते त्वचेच्या छिद्रात शिरून आतली घाण आणि त्वचेचा तेलकटपणा दूर करतं. याशिवाय मसूराचं पीठ लावल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग निघून जातात. मसुराच्या सोबत काही पदार्थ मिसळून ते लावल्याने त्वचा विकार दूर होऊन त्वचेचं सौंदर्य खुलून यायला मदत होते.