हिवाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदाब वाढणे, रक्त घट्ट होणे तसेच हृदयावर अतिरिक्त ताण येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यातच 31 डिसेंबरच्या उत्साहात मद्यपान, तेलकट पदार्थांचे सेवन आणि अचानक जास्त शारीरिक हालचाल केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत माहिती देताना डॉ. गणेश जाधव यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. जाधव यांच्या मते, 31 डिसेंबरला मद्यपान करत असाल तर त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अती मद्यपानामुळे ‘हॉलिडे हार्ट सिंड्रोम’ होण्याचा धोका वाढतो. या स्थितीत हृदयाची गती अचानक अनियमित होते. छातीत दुखणे, मानेत वेदना, श्वास घेण्यास त्रास, अचानक थकवा जाणवणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
advertisement
पार्टीदरम्यान डान्स करण्याआधी शरीराला योग्य प्रकारे वॉर्मअप देणे गरजेचे आहे. अचानक जोरात डान्स केल्याने हृदयावर ताण येऊ शकतो. तसेच दीर्घकाळ उपाशी राहून थेट मद्यपान किंवा डान्स करणे टाळावे. हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा, तेलकट आणि जड पदार्थांचे सेवन कमी ठेवावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. याशिवाय शरीर हायड्रेटेड ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
भरपूर पाणी प्यावे, मद्यपानानंतर गोड पदार्थांचे सेवन टाळावे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यावी. नियमित औषधे चुकवू नयेत आणि उशिरापर्यंत जागरण टाळावे. नववर्षाचा आनंद साजरा करताना आरोग्याला प्राधान्य देणे तितकेच महत्त्वाचे आहे. थोडी काळजी आणि संयम ठेवला तर 31 डिसेंबर सुरक्षित आणि आनंददायी पद्धतीने साजरा करता येईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.