नेमका त्रास का होतो?
तुम्ही एकाच खांद्यावर जड बॅग लटकवता तेव्हा शरीराचा नैसर्गिक समतोल बिघडतो. बॅगचं वजन पेलण्यासाठी शरीर एका बाजूला झुकतं. बॅगचे वजन 3 किलो किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याचा थेट ताण मानेवर, खांद्यांवर आणि पाठीच्या वरच्या भागातील स्नायूंवर पडतो. बराच काळ तुम्ही या स्थितीत चालत राहिलात तर एकाच बाजूचे स्नायू सतत कार्यरत राहतात आणि यामुळे तेथे सूज येणे आणि तीव्र वेदना अशा समस्या उद्भवतात.
advertisement
कोणाला आहे सर्वाधिक धोका?
डॉक्टरांच्या मते, ही समस्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. फॅशन म्हणून सतत एकाच खांद्यावर बॅग घेतल्यामुळं महिलांच्या शरीराची ठेवण कायमची बिघडू शकते. तुम्ही दिर्घकाळ याच स्थितीत बॅग घेऊन चालत राहिलात तर या सवयीमुळं फक्त खांदेच नाही तर संपूर्ण शरीराचं संतुलन डळमळीत होण्याचा धोका असतो.
हाडं, सांधे आणि स्नायूंवर होतो परिणाम
या चुकीच्या सवयीमुळं 'मस्क्युलोस्केलेटल पेन' जाणवते. हा त्रास हाडं, सांधे, स्नायू आणि लिगामेंट्समध्ये होतो. सुरुवातीला ही वेदना सौम्य वाटू शकते, परंतु त्याकडं दुर्लक्ष केल्यास भविष्यात ती गंभीर रूप धारण करू शकते.
पाठीच्या कण्यावर होऊ शकतो परिणाम
सतत एकाच खांद्यावर ओझं वाहिल्यामुळं पाठीच्या कण्यावर विपरीत परिणाम होतो. काही प्रकरणांमध्ये नसांवर दाब पडल्यामुळं हातापायांना मुंग्या येणं किंवा विजेच्या धक्क्यासारख्या तीव्र वेदना जाणवू शकतात. यामुळं स्लिप डिस्कसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
खांद्यावर बॅक कशी घ्यावी?
हे टाळण्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत. तुम्ही बॅग एकाच खांद्यावर घेत असाल तर खांदा बदलत राहा. सतत एकाच खांद्यावर बॅग न ठेवता, थोड्या वेळाने ती दुसऱ्या खांद्यावर घ्या. तुमचा प्रवासाचा वेळ जास्त असेल, तर दोन स्ट्रॅप्स असलेल्या बॅकपॅकचा वापर करा. यामुळे बॅगच संपूर्ण वजन तुमच्या दोन्ही खांद्यावर समप्रमाणात पडेल. शक्यतो बॅगमध्ये आवश्यक वस्तूच ठेवा. बॅग जितकी हलकी असेल, तितका खांद्यांवर आणि मानेवर ताण कमी पडेल.
शरीराचे संकेत ओळखा, सावध व्हा
याशिवाय चालताना किंवा उभे राहताना पाठ ताठ ठेवा. शरीर एका बाजूला झुकणार नाही याची काळजी घ्या. टोट बॅग दिसायला स्टायलिश असली, तरी तिचा चुकीचा वापर तुमच्या आरोग्यासाठी महाग पडू शकतो. शरीराचे संकेत ओळखा आणि वेळीच सावध व्हा. वेदना कमी होत नसतील तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
