गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या मंदिरात मूर्तीपूजेऐवजी साधना आणि भक्तीला अधिक महत्त्व दिलं जातं. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला डोक्यावर रुमाल किंवा टोपी घालणं अनिवार्य आहे.
अमरावती : पोहरा-चारोळीच्या जंगल परिसरात वसलेलं सावंगा विठोबा हे गाव एका अनोख्या परंपरेसाठी ओळखलं जातं. येथे कृष्णाजी अवधूत महाराजांचं भव्य मंदिर असून विशेष म्हणजे या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही. मात्र महाराजांची समाधी आणि अनेक वर्षांपासून अखंड तेवत असलेली ज्योत भाविकांसाठी श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरते.
या मंदिरात मूर्तीपूजेऐवजी साधना आणि भक्तीला अधिक महत्त्व दिलं जातं. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला डोक्यावर रुमाल किंवा टोपी घालणं अनिवार्य आहे. सकाळ-सायंकाळ होणारं अवधुती भजन वातावरण अधिक भक्तिमय करतं. नवसाला पावणारे देवस्थान म्हणूनही या ठिकाणाची ओळख असून भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.
advertisement
कापूर आणि विड्याच्या पानाचं विशेष महत्त्व
आनंद बडघरे नामक भाविक या ठिकाणी गेल्या 47 वर्षांपासून येत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरासमोर उभे असलेले 73 फूट उंचीचे दोन सागवानाचे खांब भाविकांचे विशेष आकर्षण आहेत. जीवा-शिवाची जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खांबांजवळ कापूर पेटवण्याची प्रथा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी हजारो किलो कापूर जाळला जातो. तसेच विड्याचं पान प्रसाद म्हणून दिलं जातं.
advertisement
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा
गुढीपाडव्याच्या दिवशी या खांबांवर झेंडे चढवण्याचा अनोखा सोहळा पार पडतो. सुमारे सातशे वर्षांची परंपरा असलेल्या या विधीत चरणदास कांडलकर दोरखंडाच्या साहाय्याने 73 फूट उंच खांबांवर चढून जुने कापड काढतात आणि नवीन चढवतात. ही दोन तासांची कसरत पाहण्यासाठी दरवर्षी पाच ते सहा लाख भाविकांची गर्दी उसळते.
जंगलातून आलेले भव्य खांब
मंदिरासमोरील हे सागवानाचे खांब गडचिरोलीच्या जंगलातून आणण्यात आले आहेत. तीन-चार शतके टिकणारे हे खांब मंदिराच्या परंपरेचं प्रतीक मानले जातात. या ठिकाणी मानसिक रुग्णांना आश्रमात ठेवून उपचारासारखी सेवा दिली जाते. सव्वा महिन्यात त्यांच्यात सकारात्मक बदल होतो, असा अनेकांचा विश्वास आहे. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत येथे मोठी यात्रा भरते. तसेच दसऱ्यालाही मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते. श्रद्धा, परंपरा आणि अनोख्या रीतिरिवाजांमुळे सावंगा विठोबा हे ठिकाण आजही भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 9:51 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?







