हिवाळ्यात पारा खाली घसरतो, त्यामुळे शरीराला ऊबेची गरज जाणवते. स्वेटर, शाल, जर्किन, मोजे, टोपी, रजई यांच्या बरोबरीने उष्ण पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करायचा असेल, तर या सगळ्याबरोबरच कपड्यांची योग्य निवडही केली पाहिजे. आपण कोणत्या रंगाचे कपडे घालतो, यावरही ऊब किती मिळेल, हे अवलंबून असतं.
फिकट रंगाचे कपडे
advertisement
हिवाळ्यात चुकूनही फिकट रंगाचे कपडे घालू नयेत. कारण फिकट रंगांमधून प्रकाशकिरणांचं जास्त परावर्तन होतं. यामुळे उष्णता कमी होते. उन्हाळ्यात असे कपडे वापरणं फायदेशीर ठरतं. ज्या भागात जास्त थंडी जाणवत नाही, तिथे असे कपडे घालता येऊ शकतात.
गडद रंगाचे कपडे
हिवाळ्यात शक्यतो गडद रंगाचे कपडे वापरावेत. विशेषतः काळा रंग जास्त ऊब देतो. कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो. त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे सूर्यप्रकाश शोषून घेतात व तुम्हाला ऊब जाणवते. केवळ काळाच नाही, तर निळा, गडद हिरवा, तपकिरी असे कोणतेही गडद रंग याच प्रकारे काम करतात.
कोणते कपडे वापरणं चांगलं?
उन्हाळ्यात सुती कपडे वापरण्याचा सल्ला दिला जातो, काकण हे कपडे घाम शोषून घेतात व हवा खेळती ठेवतात. थंडीतही विशिष्ट स्वरूपाचे कपडे वापरणं फायदेशीर ठरतं. लोकरीमुळे भरपूर ऊब मिळते, त्यामुळे हिवाळ्यात लोकरीचे किंवा जाड असे कोणतेही कपडे वापरावेत, पण सुती, शिफॉन, जॉर्जेट, क्रेप असे पातळ कापडाचे कपडे वापरू नयेत. नाहीतर थंडी वाजू शकते. ज्या कपड्यांमधून हवा आरपार जाणार नाही, असे कपडे थंडीत वापरावेत.
गडद रंगामधून प्रकाश जास्त परावर्तित होत नाही, त्यामुळे अशा रंगाचे कपडे वापरल्याने ऊब जास्त मिळते. त्यामुळे आपल्याकडे मकरसंक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे. कपड्यांच्या योग्य निवडीबरोबरच थंडीच्या काळात तीळ, गूळ, बाजरी व इतर उष्ण पदार्थांचा आहारात समावेश करणं हितकारक ठरतं.