बोटं मोडल्यावर जो ‘कटकट’ असा आवाज येतो, तो हाडं एकमेकांवर घासल्यामुळे किंवा कार्टिलेज तुटल्यामुळे येतो, असं अनेकांना वाटतं. पण प्रत्यक्षात हा आवाज हाडांचा नसून सांध्यांमधील वायूमुळे निर्माण होतो. आपल्या सांध्यांमध्ये सायनोव्हियल द्रव असतो, जो वंगणासारखं काम करतो. जेव्हा आपण अचानक बोटं किंवा सांधे ताणतो, तेव्हा या द्रवामधील दाब झपाट्याने कमी होतो.
advertisement
2015 साली झालेल्या एका अभ्यासानुसार, दाब कमी झाल्यामुळे सायनोव्हियल द्रवामध्ये वायूने भरलेली छोटी पोकळी तयार होते. ही पोकळी तयार होण्याच्या प्रक्रियेला “ट्रायबोन्यूक्लिएशन” असं म्हटलं जातं. याच क्षणी जो आवाज ऐकू येतो, तो बोट मोडल्याचा आवाज असतो. म्हणजेच हा आवाज हाड तुटल्याचा किंवा झिजल्याचा नसतो, हे शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट झालं आहे.
बोटं मोडण्यामुळे संधिवात होतो, ही एक सर्वात जास्त पसरलेली भीती आहे. मात्र आजपर्यंतच्या संशोधनांमध्ये बोटं मोडण्याची सवय आणि संधिवात यांचा थेट संबंध आढळून आलेला नाही. म्हणजेच बोटं मोडल्याने हमखास संधिवात होतो, असं म्हणणं चुकीचं ठरतं. तरीसुद्धा हा गैरसमज अनेक वर्षांपासून रुजलेला आहे.
एका वृत्तानुसार, या संदर्भात डोनाल्ड अनगर नावाच्या डॉक्टरांचा एक प्रयोग खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी तब्बल 50 वर्षे रोज त्यांच्या डाव्या हाताची बोटं मोडली, पण उजव्या हाताची बोटं मोडण्याचं जाणीवपूर्वक टाळलं. 2004 साली त्यांनी स्वतःचा अभ्यास प्रसिद्ध केला. त्यात त्यांना असं आढळलं की, दोन्ही हातांमध्ये संधिवात किंवा सांध्यांच्या त्रासामध्ये कोणताही फरक नव्हता.
जरी बोटं मोडण्यामुळे संधिवात होत नसला, तरी या सवयीचे काही संभाव्य दुष्परिणाम नाकारता येत नाहीत. चुकीच्या पद्धतीने किंवा खूप जोरात बोटं मोडल्यास सांध्यांवर अनावश्यक ताण येऊ शकतो. काही लोकांमध्ये यामुळे सूज, वेदना किंवा पकड कमजोर होण्यासारखे त्रास जाणवू शकतात. सतत आणि आक्रमक पद्धतीने सांधे ताणल्यास स्नायूंना किंवा लिगामेंट्सना इजा होण्याची शक्यता देखील असते.
म्हणूनच बोटं मोडण्याची सवय फारशी घातक नसली, तरी ती जाणीवपूर्वक आणि मर्यादेत ठेवणं चांगलं. सतत बोटं मोडण्याची गरज वाटत असेल, तर तो ताण किंवा चिंता दर्शवणारा संकेत असू शकतो. अशावेळी हातांचे स्ट्रेचिंग, व्यायाम किंवा तणाव कमी करण्याचे उपाय अधिक फायदेशीर ठरतात. सवयीपेक्षा आरोग्याला प्राधान्य देणं केव्हाही चांगलं.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
