दिल्लीतील राजीव गांधी हॉस्पिटलमधील कार्डिऑलॉजी विभागातील डॉ. अजित जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या गोष्टीची काळजी, मानसिक ताण, एखाद्या गोष्टीबद्दल खूप आशा किंवा निराशा, या सर्व गोष्टी हृदयाचे ठोके वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त किंवा मानसिक तणावाखाली असतो तेव्हा शरीरात ॲड्रेनालाईन हॉर्मोन मोठ्या प्रमाणात रिलीज होतं. हे एक प्रकारचं स्ट्रेस हॉर्मोन आहे. हे हॉर्मोन सक्रिय झाल्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि हृदयावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात.
advertisement
डॉ. जैन म्हणाले, "जास्त काळजी किंवा तणावामुळे आपली नर्व्हस सिस्टीम देखील अतिक्रियाशील होते आणि हृदयाला सिग्नल पाठवते. या सिग्नलमधून हृदयाला वेगात पंपिंग करण्याचा संदेश मिळतो. परिणामी हृदयाचे ठोके वाढतात. ॲड्रेनालाईन हॉर्मोन आणि नर्व्हस सिस्टीमची अतिक्रियाशीलता या दोन कारणांमुळे हृदयाचे ठोके वाढतात. काही प्रकरणांमध्ये, मानसिक तणावामुळे व्यक्तीचं ब्लड प्रेशर देखील वाढतं. ब्लड प्रेशर वाढल्यानंतरही हृदयाचे ठोके वाढतात. मानसिक तणावामुळे हृदयाच्या शिरा आकुंचन पावतात. कमी जागेत जास्त रक्तप्रवाह शिरल्यामुळे हृदयावर दाब पडतो आणि हृदयाचे ठोके वाढू लागतात."
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तणावाच्या घटनांमध्ये हृदयाचे ठोके वाढणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण, जर हृदयाचे ठोके सतत वाढत असतील आणि या दरम्यान तुम्हाला श्वसनाचा त्रास होत असेल किंवा चक्कर येत असेल तर हे चांगलं लक्षण नाही. हृदयाचे ठोके सतत वेगात पडत राहिल्याने हृदय निकामी होण्याचा धोकाही असतो.
तुमच्या हृदयाचे ठोके वाढत असल्याची तुम्हाला जाणीव झाली तर पाच मिनिटे दीर्घ श्वास घ्या आणि नंतर श्वास सोडा. कोणत्याही गोष्टीची काळजी न करता एका जागी शांत बसा. थोडं पाणी प्यावं आणि शतपावली केल्याप्रमाणे हळूवार चाला. हे करूनही तुम्हाला आराम वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.