नाशिक: राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसला नाही तेच नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणुकीच्या धामधुमीत 400 कोटी रुपयांच्या कंटेनरची लुट झाल्याचा प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात ५ जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिकमधून एका तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं, त्यातून हा प्रकार समोर आला. तब्बल ४०० कोटी रुपयांची कंटेनर चोरी केल्याच्या प्रकरणात राजकीय आणि बिल्डराचा हात असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये एक अपहरणाचं प्रकरण घडलं. त्यातूनही चोरीची घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील चोरली घाटात ही १६ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. २००० रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेला हा कंटेनर होता. नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाच्या अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणाच्या तपासातून ही ४०० कोटी रुपयांची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी, जनार्दन धायगुडे (मुंबई) याच्याविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संदीप पाटील नावाच्या तरुणाने एका व्हिडीओमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे.
संदीप पाटील काय म्हणाला?
मी संदीप पाटील. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी कर्नाटकमधील चोरला घाटामध्ये दोन कंटेनरमध्ये ४०० कोटी रुपये होते. हे पैसे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्टला जात होते. कंटेनर जेव्हा कर्नाटकमधील चोरला घाटात पोहोचले तेव्हा चोरांनी रात्रीच्या अंधारात लुटले होते. या कंटेनरमध्ये २००० रुपयांच्या जुन्या नोटा होत्या. त्या नोटांचा मुळ मालका हा ठाण्यातील बिल्डर आहे. त्यांचे हे पैसे होते. त्यांच्या जवळचा माणूस जयश कदम याने २० ऑक्टोबर रोजी रात्री व्हॉट्सअपवर फोन केला. तुझ्या नावाची तक्रार आली आहे. तुझी आम्हाला चौकशी करायची आहे, उद्याच्या उद्या मला घोटीला भेटायला ये. त्यानंतर २१ तारखेला दिवाळी असल्यामुळे मी २२ तारखेला घोटीला भेटायला गेलो, त्यांनी मला बळजबरीने त्यांच्या फॉर्च्युनरमध्ये बसवलं. त्यांनी मला नाशिकला घेऊन गेले. या गाडीत विशाल नायडू, सुनील धुमाळ होते. त्यांनी मला तूच भाऊ पाटील आहे, तूच आमच्या शेटचा कंटेनर लुटला आहे. ते आरोपी तुझ्या नावाने फोन करत आहे, ते १०० कोटी रुपये लुटले आहे का? असं म्हणत मला मारहाण केली, असं संदीप पाटील याने एका व्हिडीओमध्ये सांगितलं.
पोलिसांंनी काय सांगितलं?
संदीप पाटील याच्यावर कंटेनर लुटल्याचा आरोप लावून त्याला काही लोकांनी धमक्या दिल्या. काही लोकांनी त्याला मारहाण केली, त्याचं अपहरण केलं होतं. या प्रकरणी आम्ही ५ जणांना अटक केली तर २ जणांचा शोध सुरू आहे. पाचवा आरोपी विराट गांधी आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासासाठी स्पेशल टीम तयार करण्यात आली आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य निखेलकर यांनी दिली.
दरम्यान, हे प्रकरणाचे स्वरूप अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि उच्च आर्थिक मूल्याचे असल्याने तसंच यात राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेता निष्पक्ष आणि स्वतंत्र तपासासाठी 'एसआयटी'ची नियुक्ती करण्यात आली असल्याचं पोलिस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
या प्रकरणात आत्तापर्यंत 5 आरोपी अटक 2 आरोपींचा शोध सुरू आहे. ज्या आरोपींना अटक केली आहे, त्यांनीच हा कंटेनर गायब केल्याचा आरोपही संदीप पाटील याने केला आहे, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
