नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, चरण रायमल (वय २७ वर्ष, राहणार कैकाडी मोहल्ला, जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. चरण हा पेशाने कारचालक म्हणून काम करायचा. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरून नूतन वसाहत परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रस्त्याने जात होता.
तो रुग्णालयाजवळ पोहोचला असता, पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याला गाठले. काही कळायच्या आत हल्लेखोरांनी गावठी पिस्तूल काढून चरणवर थेट गोळीबार केला. अत्यंत जवळून त्याच्या डोक्यात तीन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या लागताच चरण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला.
advertisement
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
भररस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात मोठी पळापळ झाली. नागरिकांनी तातडीने चरणला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. गोळ्या थेट डोक्यात घुसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जुन्या वादातून हत्या?
प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या जुन्या वादातून झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. भरवस्तीत आणि जिल्हा रुग्णालयासारख्या गजबजलेल्या ठिकाणी असा प्रकार घडल्याने शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून हल्लेखोर कोणत्या दिशेला पसार झाले याचा शोध घेत आहेत. संशयित आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
