धाराशिव : राज्यभरात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पैसे वाटप, बोगस मतदारांच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. अशातच तुळजापुरात मतदानासाठी आलेल्या महिलेचा मतदान केंद्रावर चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघामध्ये ही घटना घडली. राजश्री भोसले (वय ६३) असं या वृद्ध महिलेचं नाव आहे. राजश्री भोसले या तुळजापूर येथील रहिवासी होत्या.
advertisement
आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास राजश्री भोसले या मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्या होत्या. पण अचानक त्या चक्कर येऊन पडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मतदान केंद्रावर उपस्थितीत गावकरी आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
राजश्री भोसले यांना तातडीने उपचारासाठी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. पण, उपचारादरम्यान राजश्री भोसले यांचा मृत्यू झाल्याची माहिती तुळजापूर तहसीलदारांनी दिली. राजश्री भोसले यांचाा ह्रदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ऐन मतदानाच्या दिवशी भोसले यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, राज्यभरात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतमोजणी उद्या, बुधवारी ३ डिसेंबर रोजी होणार होती. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील काही नरगपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय न्यायालयाने दिला. तर काही नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका आणि काही प्रभागातील मतदान हे २० डिसेंबर रोजी होणार आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन हायकोर्टाने एकाच दिवशी मतमोजणी करण्याचे आदेश दिले आहेत.
