कोकणात पाऊस कमी होणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवरून पुढील काही दिवस जोरदार पावसाची तीव्रता कमी होईल. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली. यंदा कोकणात 100 टक्क्यांपेक्षा जास्तच पाऊस झाला आहे.
advertisement
विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी वीजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सतत पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस
औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण राहून अधूनमधून पाऊस कोसळेल. विदर्भातील जिल्ह्यांत नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नद्या-नाल्यांच्या काठावर जाण्याचे टाळावे, अशी सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.