विशेष बाब म्हणजे युतीची घोषणा होत असताना बुधवारी जल्लोषात सामील झालेला एक बडा नेता देखील भाजपात जाणार आहे. यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. नाशिकचे दोन माजी महापौर आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिग्गज नेते विनायक पांडे यांच्यासह यतिन वाघ हे भाजपच्या गळाला लागले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असून, यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
ठाकरे गट आणि काँग्रेसला एकाच वेळी धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. विनायक पांडे हे ठाकरे गटाचे अत्यंत विश्वासू आणि आक्रमक नेते मानले जातात. बुधवारी सकाळी ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा झाल्यानंतर जल्लोषात सहभागी झालेले पांडे आता थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने शिवसैनिकांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यांच्यासोबतच यतिन वाघ हे देखील कमळ हाती घेणार आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसचे नाशिकमधील बडे नाव असलेले शाहू खैरे भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. खैरे यांच्यासारखा अनुभवी चेहरा भाजपमध्ये गेल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपची ताकद शहरात अधिक वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
गिरीश महाजन यांची 'फिल्डिंग' यशस्वी?
उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात गिरीश महाजन यांचा चांगला होल्ड आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे तीन बडे नेते गळाला लावल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. एकाच वेळी ठाकरे गट आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचून भाजपने महाविकास आघाडीला नाशिकमध्ये धोबीपछाड दिली आहे.
