कोपरगावमध्ये सकाळपासून तणावपूर्ण वातावरणामध्ये मतदान सुरू आहे. दुपारी पुन्हा एकदा मतदान प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याचा दोन्ही पक्षांचा एकमेकांवर आरोप केला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यामुळे कोपरगावमध्ये पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. घटनास्थळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
advertisement
राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला लागल्याने मतदानाच्या दिवशी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू आहे.
उमेदवाराच्या मुलाला मारहाण
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासून वाद विवाद होताना दिसत आहेत. कुठे बनावट मतदान केल्याचा आरोप तर कुठे मतदारांवर दबाव आणत असल्याचा आरोप करत धक्काबुक्की करण्यात आली. एवढंच नाहीतर उमेदवाराच्या मुलाला मारहाण यामुळे ही नगरपालिकेची निवडणूक वाद विवादाने रंगली आहे.
ज्या केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवाराच्या मुलाला मारहाण केली. त्या केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या पत्नी ठाण मांडून बसल्या आहेत. विरोधकांना आपला पराभव दिसत असल्याने शांततेत सुरू असलेली मतदान प्रक्रिया बिघडवण्याचं काम ते करत असल्याचा आरोप चैत्राली काळे यांनी केला.
