रोहित पवार कंत्राटी भरती
राज्यामध्ये तरुणांच्या नोकरीचा प्रश्न गंभीर आहे. जवळपास 70 हजार तरुणांनी परीक्षा दिली आहे. त्यांच्यामध्ये आज भीतीचं वातावरण आहे. सरकारने कंत्राटी बेसवर भरती करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय नेमक्या कोणासाठी आणि कशासाठी असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे. कंत्राटी तत्वावर जे तरुण काम करतात, त्यांना पुरेसा पगार मिळणार नाही. ज्या कंपन्या हे काम घेणार आहेत, त्यांना पंधरा टक्के कमिशन हे घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे आपले कार्यकर्ते पोसण्यासाठी सरकारने कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. हा अत्यंत चुकीचा निर्णय असून सरकार तरुणांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचे दिसत असल्याचे पवार म्हणाले.
advertisement
कोण माजी होणार हे येत्या निवडणुकीत ठरेल : रोहित पवार
नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. तुम्ही सिनियर केजीमध्ये आहात जरा बाहेर पडून मतदारसंघात फिरा नाहीतर लोक माजी करतील, असा टोलाही राणे यांनी लावला होता. यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले त्यांना प्रश्न काय विचारला होता आणि ते काय उत्तर देताय हे तुम्हीच पाहा. माजी हा शब्द त्यांचा फारच जवळचा असल्याचा दिसतोय. कारण त्यांचे बंधूही सध्या माजी खासदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राणे यांच्या निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जर लक्ष घातलं कोण माजी होईल हे कळेल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
वाचा - ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? एकनिष्ठ शिवसैनिक मुंबईत करणार शक्तीप्रदर्शन
96, 92 कुळी करून समाज्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करू नये : पवार
मराठा आरक्षणाच्या आंदोलनांमध्ये आरक्षण मागणारे 96 कुळी नव्हते, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले 96, 92 कुळी करून एका मोठा समाजामधील ताकद कमी करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. नारायण राणे साहेब हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते कुठल्या हेतूने बोललेत हे मी सांगू शकत नाही. मात्र, एका जातीत परत पोटजात करून ताकत कमी करू नये. महाराष्ट्रातील जनता जातीपातीचे आणि धर्माधर्माचं राजकारण कधी स्वीकारत नाही. मात्र, असा प्रयत्न भाजप करत असेल तर ते योग्य नसल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.