अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसणीचे स्मरण होऊन जनसंघ-भाजपच्या वळचणीला जायचे नाही, असा निर्धार बोलून दाखवत सत्तेविरोधात संघर्ष करण्याची भूमिका स्वीकारली. परंतु सत्तेच्या बाहेर फार दिवस राहू शकत नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची प्रकृती असल्याने झाला एवढा संघर्ष बस्स झाला, आता सत्तेत जायला हवे, असे मत शरदचंद्र पवार पक्षातील एका गटाचे आहे. विरोधात बसणे हा स्वभावगुण राष्ट्रवादीच्या प्रकृतीच्या विरोधात असल्याने १० आमदारांपैकी बहुतांश आमदार हे सत्तेच्या बाजूने जाण्याच्या तयारीत आहेत.
advertisement
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत साप्ताहिक बैठकीत काय झालं?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकीत दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणावर चर्चा झाली. पदाधिकारी आणि आमदारांनी अजितदादांचेच नेतृत्व मान्य करून विलिनीकरण केले जावे, अशी भूमिका घेतल्याचे कळते. तसेच सुप्रिया सुळे यांनी केंद्रात नेतृत्व करावे पण राज्यात त्यांनी हस्तक्षेप करू नये अशी भूमिकाही नेते आमदारांनी घेतल्याची माहिती आहे. तसेच अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना माफी मागितल्याशिवाय विलिनीकरणात समाविष्ट करू नये, अशीही आग्रही मागणी आमदारांनी अजित पवार यांच्यासमोर ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली? अजित पवार म्हणाले...
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनाच माध्यमांनी सविस्तर विचारले असता, ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरणाच्या निर्णयावर सध्या तरी कोणतीही चर्चा झालेली नाही.
विलिनीकरणासंदर्भातील कोणताच प्रस्ताव कुणीही मांडलेला नाही, त्यामुळे चर्चा होण्याचा सध्या तरी विषय नाही, असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचे विलिनीकरण, अंकुश काकडे यांचे सु्प्रिया सुळे यांना पत्र
दुसरीकडे शरद पवार यांचे पुण्यातील निकटचे सहकारी अंकुश काकडे म्हणाले, मी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून त्यांना पुण्यातील परिस्थितीची माहिती दिली. आघाडी बरोबर गेलो तर काय होईल आणि नाही गेलो तर काय होईल तसेच स्वतंत्र लढलो तर काय फायदे तोटे असतील, याची जाणीव मी ताईंना करून दिलेली आहे. पत्रात मी विलिनीकरणासंदर्भात लवकर भूमिका घेण्याची विनंती केली आहे, असे सांगितले. राजकारणात झालेली टीका विसरून जायची असते, असे अंकुश काकडे म्हणाले.