महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्याचे धोरण मागे घेण्यात यावे यासाठी राजकीय पक्ष, साहित्यिक तसेच पालकांनीही थेट भूमिका घेतली. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालवून घेणार नाही, असा ठाम पवित्रा शिवसेना, मनसे, काँग्रेस तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतल्यानंतर सत्ताधारी काहीसे बॅकफूटला गेले. हिंदीला सर्वच स्तरातून विरोध होऊ लागल्यानंतर सांगोपांग चर्चेनंतरच निर्णय घेऊ असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. त्यानंतर आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना चौथीपर्यंत हिंदी नकोच, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
advertisement
हिंदीसक्तीवर अजित पवार यांचे मोठे वक्तव्य
अजित पवार म्हणाले, मला असे वाटते पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीपर्यंत हिंदी असू नये. ५ व्या वर्गापासून हिंदी भाषा असावी. अनेक तज्ज्ञांचे हे म्हणणे आहे. कोणत्याही भाषेला विरोध नाही. त्या दोन्ही भाषा लोकांना येतात. लिहिता वाचता येते, कारण त्या सारख्या आहेत. पण बोलायला पाचवीपासून शिकवली जावी. सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमात शिकवावी.
हिंदीसक्तीवर तज्ज्ञांचे मत काय आहे?
एकाच वेळी दोन भाषा शिकताना मुलांचे बौद्धिक नुकसान होते. पहिलीमध्येच दोन किंवा तीन भाषा शिकणाऱ्या मुलांच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतून असावे. पाचवीनंतर इतर भाषा शिकणे सोपे जाते. शिवाय प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाले तर इतर विषयांचे आकलन करणे सोपे होते, हे शिक्षण तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊन पहिली ते चौथी हिंदी भाषा सक्ती असू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.