राज्यातील अनेक भागांत वादाचे प्रसंग घडल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करीत अशा घटनांवर संताप व्यक्त केला. अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. त्याचबरोबर लोकशाहीत हिंसेचाराला स्थान नसल्याचे सांगत कुणाला निवडून द्यायचे ते जनतेला ठरवू द्या, असे अजित पवार म्हणाले.
advertisement
हिंसाचाराला लोकशाहीत स्थान नाही
महाराष्ट्रातील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, हिंसाचाराला आपल्या लोकशाहीत कोणतंही स्थान नाही. निवडणूक ही पवित्र प्रक्रिया आहे आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरणात, कोणाच्याही दबावाखाली न येता मतदानाचा आपला मूलभूत हक्क बजावता आला पाहिजे.
ते लोक संविधानाच्या विरोधात वागत आहेत
आपले अमूल्य मत कोणाला द्यायचं, कोणाला निवडून आणायचं हे जनतेला ठरवू द्या. आघाडी हा धर्म राजकीय वर्तुळातील सर्वांनी पाळला पाहिजे. परंतु त्याही पुढे जाऊन, जो कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल किंवा जोर-जबरदस्तीनं मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल, तो संविधानाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या मूल्यांच्या विरोधात वागत आहे. अशा प्रकारचं वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
