शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी युगेंद्र पवार दिल्लीत दाखल झाले होते. यावेळी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर वाढदिवसाचे सेलिब्रेशन पार पडले.या सेलिब्रेशनमध्ये शरद पवारांनी तलवारीने केक कापला होता. या सेलिब्रेशन नंतर पत्रकारांशी बोलताना युगेंद्र पवार यांनी शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीचा तपशील सांगितला. अजित पवारा येणार होते हे मला माहितच नव्हतं. पण आमच्या कुटुंबियांनी नेहमीच कौटुंबिक संबंध वेगळे ठेवले आहेत. शेवटी शरद पवारांचा 85 वाढदिवस या कारणने ते भेटले असतील, असे युगेंद्र पवार यांनी सांगितलं.
advertisement
दरम्यान अजित पवार आणि शरद पवारांची ही भेट राजकीय नव्हतीच तर कौटुंबिक असल्याचेही युगेंद्र पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच निवडणुकीत इतक्या टोकाच्या टीका झाल्या नाहीत. सगळ्यांनीच पातळी काही सोडली नाही. राजकारण एका बाजूला आणि कौटुंबिक नातं एका बाजूला असले पाहिजे, असे देखील युगेंद्र पवारांनी सांगितले आहे.
'या' मुद्द्यांवर शरद पवारांशी चर्चा
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज शरद पवारांचा वाढदिवस आहे, उद्या प्रतिभा काकींचा वाढदिवस आहे. आजचं दोघांना भेटलो, त्यांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतला असल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले, शरद पवारांसोबत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. परभणीमधील हिंसाचाराच्या घटनेची त्यांनी माहिती घेतली. त्याशिवाय संसदेचे हिवाळी अधिवेशन आणि राज्यातील इतर राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाली असल्याचेही अजित पवारांनी सांगितले. मी कुटुंबातील सदस्य आहे, मी बाहेरचा कोणीच नाही, असेही अजित पवारांनी सांगितले. आजची भेट ही कौटुंबिक असल्याचाही निर्वाळा त्यांनी दिला.
