दरम्यान, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवार हे बीडमध्ये येत असताना परळीचे आमदार धनंजय मुंडे मात्र या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत. अजित पवार यांचा दौरा अचानक ठरलेला असल्याने आणि माझे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी या दौऱ्याला उपस्थित राहू शकणार नाही, अशी माहिती आमदार धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्टद्वारे दिली आहे.
advertisement
धनंजय मुंडे यांच्या या पोस्टनंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. कारण अजित पवारांच्या दौऱ्याला गैरहजर राहण्याची धनंजय मुंडेंची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी नगरपालिका निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी बीड जिल्ह्यात एकूण पाच सभा घेतल्या होत्या. या प्रत्येक सभेवेळी धनंजय मुंडे गैरहजर राहिले होते. आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंनी अचानक अजित पवारांच्या दौऱ्याला दांडी मारली आहे.
धनंजय मुंडेंनी अलीकडेच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. संतोष देशमुख खून प्रकरणात अडचणीत सापडलेल्या नेत्याने अशाप्रकारे अमित शाहांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता या भेटीचं आणि अजित पवारांच्या दौऱ्याशी जोडलं जात आहे.
धनंजय मुंडे फेसबूक पोस्टमध्ये नक्की काय म्हणाले?
धनंजय मुंडे फेसबूक पोस्टमध्ये म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांचे नवीन वर्षानिमित्त बीड जिल्ह्यामध्ये हार्दिक स्वागत. मागील दोन-तीन दिवसांमध्ये आदरणीय अजितदादांचा बीड जिल्हा दौरा नियोजित होता. मी यात पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. मात्र काही कारणांनी मागील दोन तीन दिवसांतला तो दौरा रद्द करण्यात आला."
"आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आदरणीय अजितदादा यांचा बीड दौरा ऐनवेळी ठरवण्यात आला असून माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी बीड जिल्ह्यात या दौऱ्यात उपस्थित नाही, याबाबत अजितदादा यांच्यासह पक्षश्रेष्ठींना कल्पना दिली आहे. सर्व प्रकारच्या माध्यमांना माझी विनंती आहे, कृपया याबाबतीत कोणताही गैरसमज होईल, अशा बातम्या प्रसिद्ध करू नयेत...", असं धनंजय मुंडे म्हणाले.
