Youtube वर video पाहुन केली शेती, शिक्षकाचा टरबूज-खरबुज प्रयोग यशस्वी, इतक्या लाखांचा नफा
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतीची आवड आणि आधुनिक माहितीचा योग्य वापर करत त्यांनी खरबूज आणि टरबूज लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. अवघ्या 60 ते 65 दिवसांत खर्च वजा करून दोन ते अडीच लाख रुपयांचा नफा त्यांना मिळणार आहे.
सोलापूर : शेतीत नवनवीन प्रयोग करून कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळवता येते, याचे उत्तम उदाहरण मोहोळ तालुक्यातील शिक्षक शेतकरी बाबासाहेब मेटकरी हे होय. शेतीची आवड आणि आधुनिक माहितीचा योग्य वापर करत त्यांनी खरबूज आणि टरबूज लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. अवघ्या 60 ते 65 दिवसांत खर्च वजा करून दोन ते अडीच लाख रुपयांचा नफा त्यांना मिळणार आहे.
मोहोळ येथील बाबासाहेब मेटकरी यांच्याकडे सुमारे 14 एकर शेती आहे. त्यांचे शिक्षण एम.ए., बी.एड. पर्यंत झाले आहे. मेटकरी यांच्या वडिलांकडून पारंपरिक पद्धतीने ऊस, मका आणि ज्वारीची शेती केली जात होती. मात्र बाबासाहेब यांना शेतीत काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी युट्युबवर विविध शेतीविषयक व्हिडिओ पाहून खरबूज आणि टरबूज लागवडीची सविस्तर माहिती घेतली.
advertisement
युट्युबवर मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी अडीच एकर क्षेत्रात खरबूज आणि अडीच एकर क्षेत्रात टरबूज अशी लागवड केली. सध्या ते दरवर्षी या पिकांची लागवड करत आहेत. खरबूज आणि टरबूज लागवडीसाठी एकरी साधारणपणे एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, असे मेटकरी यांनी सांगितले.
advertisement
या पिकांच्या यशासाठी वेळेवर पाणी देणे, योग्य खत व्यवस्थापन करणे तसेच रोग-कीड नियंत्रणासाठी नियोजनबद्ध फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे बाबासाहेब दररोज शेतात जाऊन पिकांची पाहणी करतात आणि आवश्यक ते उपाय तत्काळ करतात.
योग्य व्यवस्थापन केल्यास खरबूजाचे एकरी 13 ते 15 टन उत्पादन मिळते, तर टरबूजाचे एकरी 16 ते 17 टन उत्पादन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या उत्पादनाच्या विक्रीतून लागवडीचा खर्च वजा करता अवघ्या 60 ते 65 दिवसांत दोन ते अडीच लाख रुपयांचा नफा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकाची जबाबदारी सांभाळत शेतीतही प्रयोगशीलता दाखवणाऱ्या बाबासाहेब मेटकरी यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 6:52 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Youtube वर video पाहुन केली शेती, शिक्षकाचा टरबूज-खरबुज प्रयोग यशस्वी, इतक्या लाखांचा नफा







