दोन टोकाच्या विचारसरणीचे कट्टर विरोधी पक्ष असलेले एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष सत्ता समीकरणे जुळविण्यासाठी एकत्र आल्याची देशभर चर्चा झाली. परंतु विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवल्यानंतर झाल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आम्ही सत्ता स्थापनेसाठी एमआयएमशी कदापि युती करणार नाही, असे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच एमआयएम पक्षानेही भाजपसोबत युती केली नसल्याचे सांगून केवळ त्यांनी मागितला म्हणून आम्ही पाठिंबा दिल्याचे पत्रक प्रसिद्धी केले. यानंतर एमआयएम-भाजपच्या युतीची चर्चा मागे पडत असतानाच आता स्वीकृत नगरसेवकासाठी एमआयएमने पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने पुन्हा दोन्ही पक्षाच्या लोकांमधल्या मधुर संबंधांची चर्चा होत आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
अकोट नगर परिषदेच्या निकालानंतर आणि सत्ता स्थापनेनंतर आता स्वीकृत नगरसेवकपदासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एमआयएमच्या पाच नगरसेवकांकडून भाजपच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला गेला. जितेन बरेठिया यांना एमआयएमने पाठिंबा दिला.
एमआयएम-भाजपच्या युतीच्या दुसऱ्या अंकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सडकून टीका केली. भाजप-एमआयएम हे एकच पक्ष असून एक जण हिंदूंसाठी तर एक जण मुस्लिमांच्या विकासाच्या गोष्टी करतो आणि निवडणूक झाल्यानंतर एकत्रित येतो. आजही अकोटमध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठी एमआयएमने भाजपला पाठिंबा देऊन ते एक असल्याचे दाखवून दिले, अशी टीका काँग्रेसने केली.
