भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील हे प्रभाग क्रमांक 17 मधील आदर्श इंग्लिश मीडियम स्कुलच्या मतदान केंद्रावर समोरासमोर आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. 'मतदान केंद्रावर दडपशाही सुरू आहे, इतकी कुठे दादागिरी सुरू असते का, भाजपच्या उमेदवारांना मतदान केंद्रात जाऊ दिले जात नाही, विरोधी पक्षाच्या लोकांकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केला. तसंच, या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
advertisement
तसंच, रक्षा खडसे पोलिसांना जाब विचारत असतानाच आमदार चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रावर आले. चंद्रकांत पाटील हे आपल्या कार्यकर्त्यासह मतदान केंद्रात जाताना दिसले, त्यामुळे अशीच गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केला.
तर, ' गुंडगिरी करून बोगस मतदान करणे ही दादागिरी नाही का? बोगस मतदान केले जात आहे. मलकापूर या ठिकाणी माणसं बोलवण्यात आली. काही जणांचे बोगस आयडी कार्ड तयार केले आहे. त्यांना इथं मतदानासाठी बोलावलं आहे. त्यांच्याविरोधात आम्ही आवाज उठवला आहे. मग गुंडगिरी कशी आहे. आम्ही मतदान केंद्राच्या बाहेर उभे आहोत. पण, केंद्रीय मंत्री इथं येऊन याचना करत आहे, गुंडगिरी गुंडगिरीचा आरोप करत आहे. तुम्ही किती भुखंड बळकावले, गुंडशाहीने लोकांचे केबल कनेक्शन कसे बंद केले, याला गुंडगिरी म्हणतात, असा पलटवार शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.
३ संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
तर मुक्ताईनगर या ठिकाणी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आमदार आणि खासदार या ठिकाणी उपस्थित असताना मोठ्या प्रमाणावर ती या ठिकाणी गोंधळ बघायला मिळाला. पोलीस या ठिकाणी पोहोचल्याने कार्यकर्त्यांना समजूत घालून मतदान केंद्रातून बाहेर काढण्यात आलं. याच मतदान केंद्रावर पोलिसांनी तीन संशयित यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर तपास करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
