बीड : बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बनावट औषधींचा पुरवठा होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ठाणे, गुजरातमधील चौघांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
गोरगरीब रुग्णांवरील उपचारासाठी आधारस्थान असलेल्या बीडच्या अंबाजोगाई येथील
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ठाणे आणि सुरत (गुजरात) मधील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
सध्याच्या खाजगी रुग्णालयातून मिळणाऱ्या महागड्या उपचारपद्धतीमुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्ण स्वस्त आणि खात्रीपूर्वक उपचारासाठी स्वाराती रुग्णालयास प्राधान्य देतात. एका अर्थाने हे रुग्णालय गोरगरिबांसाठी वरदान आहे. मात्र या रुग्णालयात महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधीचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे.
या प्रकरणी औषधी निरिक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय पाटील, मिहीर त्रिवेदी (रा. भिवंडी, जि.ठाणे),द्विती सुमित त्रिवेदी (रा. सुरत) आणि विजय शैलेद्र चौधरी (रा. मिरा रोड ठाणे) या चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या मागे आंतरराज्यीय टोळी असून अनेक राज्यात त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता देखील फिर्यादीत व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.